पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर आता लोकसभेच्या तयारीचे सर्व पक्षांना वेध लागले आहेत. अद्याप अवकाश असला तरी मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. भाजपात मोदींनंतर योगींच्या नावाला पसंती दिली जात आहे. तर विरोधकांमध्ये तिसरी आघाडी सुरु करण्याचा विचार सुरु आहे. यातच काँग्रेसला सोबत घेताना युपीएचा नेता कोण असेल यावरही खलबते सुरु आहेत. या साऱ्या घडामोडींवर रॉचे माजी प्रमुख अमरजीत सिंह दुल्लत (AmarjitSingh Dullat) यांनी जुना किस्सा सांगितला आहे.
दिल्लीत कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये पुण्यातील सरहद संस्थेतर्फे संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी त्यांनी पुण्यातील काही वर्षांपूर्वीच्या भाषणाचा किस्सा सांगितला. ते म्हणाले होते की, पुढील पंतप्रधान बनला शीख तर मराठाच बनेल. तेव्हा मला पुण्याचे माजी महापौर म्हणाले की तुम्ही मस्करी करताय की खरे बोलताय. यावर मी त्यांना म्हणालेलो मी इथे मस्करी करायला थोडीच आलोय.
मेघालयचे राज्यपाल सत्यपाल सिंह मलिक आणि रॉ चे माजी प्रमुख अमरजित सिंह दुलत यांना संत नामदेव पुरस्कार देण्यात आला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार होता, पण पवार सोहळ्याला अनुपस्थित राहिले. मात्र, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी अचानक या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यापूर्वीच ते ईडीच्या चौकशीला सामोरे गेले होते.
मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिकांनी म्हटले की, निवृत्तीनंतरही मी शेतकऱयांसाठी झटत राहणार आहे. सत्तेच्या नशेत गुंग असलेल्यांनी लक्षात ठेवा या देशातला शेतकरी आज ना उद्या क्रांती केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला.