नवी दिल्ली : एखाद्या युजरचे अकाउंट समाप्त झाल्यानंतर त्या युजरची माहिती सर्व्हरवर राहत नाही, असा खुलासा बुधवारी व्हॉटस् अॅपच्या वतीने हायकोर्टात करण्यात आला. व्हॉट्स अॅपच्या वतीने न्यायालयात असेही सांगण्यात आले की, आमचे धोरण हे युजर्सच्या गोपनीयतेचे कुठेही उल्लंघन करीत नाही; तर ‘एंड टू एंड इन्स्क्रीप्शन’मुळे तिसरी व्यक्ती मॅसेज वाचू शकत नाही. या प्रकरणी न्यायालयाचा निर्णय आता शुक्रवार, दि. २३ सप्टेंबर रोजी अपेक्षित आहे.
कर्मण्यासिंह सरीन व श्रेया सेठी यांच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म व्हॉट्स अॅपने ही माहिती दिली. याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील प्रतिभा सिंह यांनी बाजू मांडली. मुख्य न्यायाधीश जी. रोहिणी आणि न्या. संगीता ढिंगरा सहगल यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण आहे. अकाउंट समाप्त झाल्यानंतर युजर्सची माहिती राहते का, असा सवाल न्यायालयाने केला. त्यावर व्हॉट्स अॅपने ही माहिती दिली. मॅसेज डिलिव्हर्ड झाल्यानंतर तो डीलीट करण्यात येतो. तर डिलिव्हर्ड न झाल्यास तो ३० दिवसांपर्यंत ठेवण्यात येतो, असेही सांगण्यात आले. अर्थात, व्हॉट्स अॅपच्या या खुलाशाचा व नव्या गोपनीय धोरणाचा याचिकाकर्त्यांनी विरोध केला. न्यायालयाने स्पष्ट केले की, २३ सप्टेंबर रोजी याबाबत निर्णय देण्यात येईल.फेसबुकने व्हॉटस् अॅपचा ताबा घेतल्यानंतर व्हॉटस् अॅपने २५ आॅगस्ट रोजी धोरणात बदल केला आहे. त्यानुसार युजर्सला आपली माहिती शेअर करण्यासाठी या सर्वांत मोठ्या सोशल नेटवर्किंग साईटचा फेसबुकचा पर्याय देण्यात आला आहे. अर्थात, हा पर्याय नको असल्यास ३० दिवसांच्या आत म्हणजेच २५ सप्टेंबरपर्यंत युजर्सला यातून बाहेर पडता येईल.