ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 29 - उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर बसपाच्या सर्वेसर्वा मायावती आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी ईव्हीएममध्ये गौंडबंगाल असल्याचा मुद्दा उपस्थित करत यामागे भाजपा असल्याचा आरोप केला होता. आता मायावती व केजरीवाल यांच्या पाठोपाठ उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही ईव्हीएमबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं पाहायला मिळाले.
तंत्रज्ञानाचा गैरवापर थांबवणं आवश्यक आहे, अशा आशयाचे ट्विट अखिलेश यांनी केले आहे. इंटरनेट कनेक्शनशिवाय रिमोटद्वारे चिपच्या सहाय्याने पेट्रोल चोरी केली जाऊ शकते, त्याचप्रमाणे ईव्हीएममध्येही छेडछाड होणं शक्य आहे, असे ट्विट करत अखिलेश यांनी ईव्हीएम गोंधळावरुन भाजपाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मायावती यांनी ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा आरोप करत भाजपावर हल्लाबोल चढवला होता.
दरम्यान, उत्तर प्रदेश निवडणुकीचे निकाल हाती आल्यापासून ते अद्यापपर्यंत अखिलेश यादव यांच्याकडून ईव्हीएम छेडछाड प्रकरणी उघडपणे प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. मात्र, अरविंद केजरीवाल आणि मायावती यांनी यासंबंधी आक्रमक भूमिका मांडल्यानंतर आता अखिलेश यांनीही ईव्हीएम गोंधळाबाबत भाजपाला धारेवर धरण्याचा विचार केल्याचे पाहायला मिळत आहे.
तर दुसरीकडे शुक्रवारी उत्तर प्रदेशातील काही ठिकाणी पेट्रोल पंपावर टाकण्यात आलेल्या धाडीसत्रात चिपद्वारे पेट्रोलची चोरी होत असल्याची बाब उघडकीस आली होती. याचाच संदर्भ देत अखिलेश यांनी चिपद्वारे पेट्रोलची चोरी शक्य आहे तर ईव्हीएममध्ये छेडछाड होणंही शक्य आहे, असे ट्विट करत भाजपावर निशाणा साधला होता.
जब रिमोट के द्वारा चिप से पेट्रोल की चोरी बिना किसी इंटरनेट कनेक्शन के हो सकती है तो ईवीएम से भी। टेक्नोलॉजी का गलत इस्तेमाल रोकना होगा।— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) April 29, 2017