नवी दिल्ली - गेल्या अनेक महिन्यांपासून भारत-चीन सीमा संघर्षावर सध्या स्थिरता आहे. भारत-चीन सीमा प्रश्नावर तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप सहन करणार नाही असं सांगत चीनने अमेरिकेवर निशाणा साधला आहे. भारतातील चीनी दूतावास वांग जिआओजियानने मंगळवारी अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांच्या विधानावर पलटवार केला आहे. अमेरिका जगावर स्वत:च्या वर्चस्वासाठी सर्व प्रकार वापरते असा आरोप त्यांनी केला.
अमेरिकेच्या विधानावर चीनचे दूतावास वांग जिआओजियान यांनी म्हटलं की, जगात शांती आणि समृद्धीसाठी चीनचे योगदान आहे. चीन नव्हे तर अमेरिका तो देश आहे जो बळजबरीने स्वत:चे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करते. अमेरिकेच्या दबावामुळे आणि धमकावल्यामुळे त्याचे सहकारी देश आणि भागीदार राष्ट्रही त्रस्त आहेत. अमेरिकेच्या या वृत्तीचा परिणाम विकसित देशांवर होत आहे असा चीनने आरोप केला.
त्याचसोबत भारत-चीन यांच्यातील सीमा संघर्षावर सध्या शांतता आहे. सध्या कुठेही दोन्ही सीमांवर झटापटी होत नाही. सीमेबाबत जो प्रश्न आहे तो भारत आणि चीन या दोन देशातील प्रश्न आहे. त्यात तिसऱ्या देशाने हस्तक्षेप केलेला आम्ही खपवून घेणार नाही असंही वांग यांनी ट्विटरवरून अमेरिकेला बजावले आहे.
काय म्हणाले होते अमेरिकेचे संरक्षणमंत्री?अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी सोमवारी सांगितले की, सध्याच्या जागतिक परिस्थितीत चीनकडून जगावर दादागिरी सुरू आहे. शांती आणि समृद्धी कायम ठेवण्यासाठी भारत आणि अमेरिका एकत्र नेतृत्व करण्याची गरज आहे. आम्हाला अजूनही खूप काम करायचे आहे. परंतु यूएस इंडिया भागीदारी इंडो पॅसेफिक आणि जगासाठी समृद्ध भविष्याचा मार्ग निर्माण करण्यात मदत करणार आहे. त्याचसोबत भारत-चीन सीमा संघर्षात अमेरिकेने कायम भारताचे समर्थन केले आहे. एप्रिलमध्ये एका वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले की, चीनकडून मिळणाऱ्या आव्हानाच्या काळात भारत अमेरिकेवर भरवसा ठेऊ शकतो. सीमा संघर्ष दोन्ही देशांनी मिळून सोडवायला हवा. जर चीनसोबत काही संघर्ष झाला तर अमेरिका भारताला पूर्ण पाठिंबा देईल असं विधान अमेरिकेकडून करण्यात आले आहे.