नवी दिल्ली - लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सर्वसामान्यांच्या हक्कांचा पुरस्कार करत रविवारी ‘व्हाइट टी-शर्ट अभियान’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. केंद्रातील सरकारला गरिबांची काळजी नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
जर तुमचा आर्थिक न्यायावर विश्वास असेल, वाढत्या संपत्तीच्या विषमतेला विरोध असेल, सामाजिक समानतेसाठी लढत आहात, सर्व प्रकारचे भेदभाव नाकारत असाल आणि आपल्या देशात शांतता आणि स्थैर्यासाठी प्रयत्नशील असाल, तर पांढरा टी-शर्ट घाला आणि मोहिमेत सामील व्हा, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की, आज सरकारने गरीब आणि कामगार वर्गाकडे पाठ फिरवली आहे. सरकारचे संपूर्ण लक्ष काही निवडक भांडवलदारांना अधिक समृद्ध करण्यावर आहे. त्यामुळे आपल्या रक्त आणि घामाने देशाला समृद्ध करणाऱ्या कामगारांची अवस्था बिकट होत असून त्यांना अन्याय व अत्याचार सहन करावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.