ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - ललित मोदींना मदत करणा-या सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी करतानाच भविष्यात दाऊद इब्राहीमने अशा स्थितीत भारताशी संपर्क साधला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनाही मदत करतील का असा खोचक सवाल काँग्रेसने मोदी सरकारला विचारला आहे. कोच्ची संघातील मालकीवरुन शशी थरुर यांचा राजीनामा मागणारे भाजपा नेते आता सुषमा स्वराज यांच्याबाबतीतही हेच धोरण ठेवतील का असा प्रश्नही काँग्रेसने उपस्थित केला आहे.
सुषमा स्वराज यांनी ललित मोदींना मदत केल्याचे उघड झाल्याने मोदी सरकारची कोंडी झाली आहे. ललित मोदी यांची पत्नी कर्करोगामुळे आजारी होती व माणूसकीच्या दृष्टीकोनातून तिला मदत केल्याचे सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे. तर भाजपाध्यक्ष अमित शहा, गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील सुषमा स्वराज यांची पाठराखण केली आहे. यावरुन काँग्रेस व आम आदमी पक्षाने भाजपावर टीकेची झोड उठवली. ललित मोदींप्रमाणेच भविष्यात दाऊद इब्राहीमनेही मदत मागितली तर तुम्ही मदत करणार का असा सवाल विरोधकांनी सत्ताधा-यांना विचारला आहे. ललित मोदींना सुषमा स्वराज यांनी मदत केल्याच्या प्रकरणात पंतप्रधानांची भूमिकाही संशयास्पद आहे असा आरोप काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी केला.