लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका ग्राहकाने डीटीएच सेवा पुरवठादार कंपनी टाटा स्कायवर खटला दाखल केला आहे. यावर ग्राहक न्यायालयाने टाटा स्कायला 30 दिवसांची मुदत दिली असून अश्लिल जाहिरातींचे प्रसारण न रोखल्यास टाटा स्कायवर बंदी आणण्याचा इशारा दिला आहे. तसेच अशा जाहिराती दाखविणाऱ्या चॅनेलवरही बंदी आणण्यात येईल, असे या न्यायालयाने सांगितले आहे.
ग्राहक न्यायालयाने मंगळवारी या याचिकेवर सुनावणी केली. यामध्ये एका ग्राहकाने गेल्या काही दिवसांपासून टीव्हीवर कार्यक्रम आणि बातम्यांच्या दरम्यान अश्लिल जाहिराती दाखविण्यात येत असल्याची तक्रार केली आहे. यावेळी घरातील लहान मुलांवर याचा गंभीर परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच या अश्लिल जाहिरातींमधून खोट्या, भ्रामक गोष्टी पसरविल्या जात आहेत. यावर तात्काळ बंदी आणण्याची मागणी केली आहे.
यावर ग्राहक न्यायालयाने डीटीएच ऑपरेटरला आदेश देत सांगितले की 30 दिवसांच्या आत त्यांच्या सेवेद्वारे दाखविण्यात येणाऱ्या अश्लिल जाहिराती, फसविणाऱ्या जाहिरातींचे प्रसारण बंद करण्यात यावे. तसेच असे न केल्यास ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला पत्र लिहिण्यात येणार आहे. या शिवाय आदेशाचे पालन न केल्यास कंपनीवरही कारवाई केली जाई आणि चॅनेलवरही बंदी आणली जाईल.