... तर अख्ख्या जगाचा कच्च्या तेलाचा पुरवठा बंद करू; रशियाची भारतातून उघड धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 22:37 IST2022-09-23T22:36:51+5:302022-09-23T22:37:26+5:30
पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या समरकंदमध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीतही यावर चर्चा झाली

... तर अख्ख्या जगाचा कच्च्या तेलाचा पुरवठा बंद करू; रशियाची भारतातून उघड धमकी
युक्रेनवरून रशिया विरुद्ध पश्चिमेकडील देश अशा दोन गटांत जग विभागले गेले आहे. भारतासारखे देश रशियाची आणि अमेरिकेची साथ सोडण्यास तयार नाहीएत. अण्वस्त्रांचा वापर करण्याची धमकी दिलेली असताना रशियाने जगाला थेट कच्च्या तेलाचा संपूर्ण जगाचा पुरवठाच बंद पाडण्याची धमकी दिली आहे.
जगातील सात विकसित देशांची संघटना जी-७ ने रशियाच्या कच्च्या तेलाच्या किंमती आंतरराष्ट्रीय दरांपेक्षा कमी करण्याचा घाट घातला आहे. या किंमती आंतरराष्ट्रीय दरांपेक्षा खाली आणून एक निश्चित अशी पातळी ठरविण्यात येणार आहे. जर असे झाले तर अख्ख्या जगाचा पुरवठा बंद पाडण्याची धमकी रशियाने दिली आहे. महत्वाचे म्हणजे ही धमकी रशियाचे भारतातील राजदूत डेनिस एलिपोव यांनी दिली आहे.
शुक्रवारी त्यांनी पत्रकार परिषदेत ही धमकी दिली. युरोपीय देश मोठ्या प्रमाणावर रशियाकडून आजही तेल खरेदी करत आहेत. मात्र, दुसऱ्या देशांना ते रशियाकडून तेल खरेदी करू नका असे सांगत आहेत. यामुळे भारताने जी-७ देशांचा हा सल्ला मानू नये, असे एलिपोव म्हणाले.
जी-7 देश रशियाच्या तेल विक्रीवर मर्यादा घालण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याची किंमत निश्चित करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना भारताने पाठिंबा द्यायला हवा असा त्यांचा प्रयत्न आहे. कारण भारत हा रशियाकडून मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी करत आहे.
आमच्यावर तेलाच्या किंमतीची बंधने घातली तर जगाचा पुरवठा रोखू, यामुळे कच्च्य़ा तेलाच्या किंमती वाढतील. याचा फटका जगाला बसेल, असेही एलिपोव म्हणाले. खरेदीदार आणि पुरवठादार यांचे हित लक्षात घेऊन दोन्ही देशांतील कंपन्या या संदर्भातील सौदे करत आहेत. दोन्ही देशांमधील ऊर्जा सहकार्य अधिक दृढ होईल. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या समरकंदमध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीतही यावर चर्चा झाल्याचे ते म्हणाले.