लखनौ - कोरोना व्हायरस प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या काही राज्यांतील जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगद्वारे संवाद साधत आहेत. त्यासोबतच, डॉक्टर्स, पॅरामेडीकल स्टाफ आणि फ्रंटलाईन वर्कर्संसोबतही चर्चा करत आहेत. मोदींनी आज वाराणसीतील जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागातील फ्रंटलाईन वर्कर्संशी संवाद साधला. त्यामध्ये, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे तोंडभरून कौतुक केलं. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या कामाचंही कौतुक केलं.
पूर्वांचल प्रदेशात अगोदर लहान मुलांमध्ये मेंदूंच्या आजारामुळे विदारक परिस्थिती होती. त्यामुळे, दरवर्षी हजारो मुले मृत्यूमुखी पडत होती. योगी आदित्यनाथ जेव्हा खासदार होते, तेव्हा लहान मुलांच्या होणाऱ्या मृत्युंमुळे ते संसदेत धाय मोकलून रडले होते. या लहान मुलांना वाचविण्याची विनंतीपूर्ण मागणी ते करत होते. मात्र, योगी आदित्यनाथ जेव्हा मुख्यमंत्री बनले, तेव्हा केंद्र सरकारसोबत एकत्र येऊन त्यांनी मेंदूंच्या आजारासाठी उपायांचं अभियान राबवलं. सद्यस्थिती कित्येक लहानग्यांना वाचविण्यात आपल्याला यश आलंय, असे मोदींनी म्हटले.
ब्लॅक फंगसचा सामना करूया
जहाँ बिमार, वहाँ उपचार.. हा आपला नवा मंत्र आहे. या सिद्धांतानुसार मायक्रो कंटेंटमेंट झोन बनवून आपण गावागावत औषधे वाटत आहात, ही कौतुकास्पद बाब आहे. ग्रामीण भागात हे अभियान अधिकपणे व्यापक करायचं आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आता ब्लॅक फंगसच्या नवीन आजाराचा सामना आपल्याला करायचा आहे. या नव्या स्ट्रेनला निपटण्यासाठी सावधानी आणि योग्य ती व्यवस्था करण्यासाठी लक्ष देण्याची गरज असल्याचं मोदींनी सांगितलं.
आरोग्य व्यवस्थेवर ताण
कोरोनाविरुद्धच्या दुसऱ्या लाटेत लढताना अनेक संकटांचा आपल्याला सामना करावा लागला आहे. यावेळी संक्रमणाचा वेग पहिल्यापेक्षा अधिक आहे. तसेच, रुग्णांना जास्त दिवस रुग्णालयात राहावे लागत आहे. या सर्व बाबींमुळे देशातील आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आलाय, असेही मोदींनी म्हटलं.