संतोष ठाकूर नवी दिल्ली : अभियांत्रिकीचे शिक्षण घेणा-यांना पदवी घेण्यासाठी आता इंटर्नशीप करणे बंधनकारक असेल. ते ज्या शैक्षणिक संस्थेत आहेत तेथे एका टप्प्याची इंटर्नशीप झाल्यानंतर वेगवेगळ्या खासगी कंपन्या, सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांत राहिलेली इंटर्नशीप पूर्ण करावी लागेल. ते ज्या ठिकाणाहून इंटर्नशीप करतील ते सरकारकडून केवळ मान्यताप्राप्तच ठरतील असे नाही तर अशा संस्था असतील की ज्या त्यांना नोकरीही देतील.केंद्रीय मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी ‘लोकमत’ने केलेल्या विशेष चर्चेतून या बदलाची माहिती जवळपास महिनाभरापूर्वीच दिली होती. जावडेकर म्हणाले होते की, सगळे तांत्रिक-अभियांत्रिकी अभ्यासक्रम जवळपास ४०-५० वर्षे जुने आहेत. तेव्हापासून या क्षेत्रांत (विज्ञान व तंत्रज्ञान) खूप बदल घडले आहेत. त्यामुळे आम्ही दरवर्षी अभ्यासक्रम बदलाचे काम करीत आहोत. यात इंटर्नशीपला जास्त महत्व देताना उद्योगांशी थेट करार केले जातील. त्यात मुलांनी असे शिक्षण घ्यावे की ज्यामुळे त्यांना नोकरी व रोजगाराची संधी प्राप्त होईल.एआयसीटीईच्या वरिष्ठ अधिका-याने सांगितले अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना आता फक्त ४-६ आठवड्यांची उन्हाळी इंटर्नशीप आवश्यक असेल. पहिल्या टप्प्यातील इंटर्नशीप विद्यार्थी जेथे शिकतो तेथेच करावी लागेल. दुसºया टप्प्याची इंटर्नशीप औद्योगिक क्षेत्र, कंपनी, अशासकीय संस्थांत करावी लागेल. इंटर्नशीपच्या प्रमाणपत्रातील फसवणूक टाळण्यासाठी विद्यार्थी जेथे इंटर्नशीप करीत आहे तेथूनच त्याच्या उपस्थितीबद्दल त्याच्या संस्थेला माहिती मिळावी असा विचार केला जात आहे.
... तर मिळणार नाही अभियांत्रिकी पदवी, अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 3:47 AM