ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १६ - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बात या रेडियोवरून प्रसारित होणा-या कार्यक्रमावर सरसकट बंदी घालता येणार नाही अशी भूमिका निवडणूक आयोगाने स्पष्ट केल्याचे वृत्त आहे. बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी व भाजपा मन की बातचा प्रचारासाठी गैरवापर करतिल अशी भीती विरोधकांनी व्यक्त केली होती. आदर्श आचार संहितेचा भंग होत असल्यामुळे या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात येत होती.
मात्र, निवडणूक आयोग या तक्रारीची दखल घेईल, परंतु सरसकट बंदी घालता येणार नाही असे मत निवडणूक आयोगातील एका वरीष्ठ अधिका-याने व्यक्त केले आहे. या रविवारीच मोदी मन की बातच्या माध्यमातून देशाशी संवाद साधणार आहेत.
या कार्यक्रमाच्या प्रसारणानंतर तक्रार आल्यास त्याचं रेकॉर्डिंग ऐकण्यात येईल आणि आचारसंहितेचे उल्लंघन झाले आहे का याची शहानिशा आयोग करेल असे अधिका-यांनी सांगितल्याचे वृत्त आहे. याआधी हरयाणाच्या निवडणुकांच्यावेळीही अशीच तक्रार काँग्रेसने केली होती, परंतु त्यावेळी निवडणूक आयोगाला गैरप्रकार आढळला नव्हता.