नवी दिल्ली : कर बुडव्यांविरुद्ध कठोर भूमिका घेत आयकर विभागाने मंगळवारी एकूण ५०० कोटी रुपयांचा कर न भरणाऱ्या १८ कंपन्यांची नावे वृत्तपत्रांत जाहीर केली. त्यातील ११ जण हे गुजरातेतील आहेत. ही नावे जाहीर करण्याचा हेतू हा की सामान्य नागरिकांना ती कळावीत आणि या करबुडविणाऱ्यांचा ठावठिकाणा त्यांच्याकडून सरकारला कळावा. कायदा गुंडाळून ठेवणाऱ्या या कंपन्यांविरुद्ध जनमत तयार व्हावे यासाठीही हे पाऊल उचलले आहे. याआधी ही नावे आयकर विभागाने आपल्या संकेत स्थळावर (वेबसाईट) प्रसिद्ध केली होती, असे वरिष्ठ आयकर अधिकाऱ्याने सांगितले. वृत्तपत्रांनी मंगळवारच्या अंकात कर बुडविणाऱ्यांची नावे व त्यांच्याशी संबंधित माहिती आयकर विभागाच्या येथील प्रिन्सिपॉल चीफ कमीशनरांनी (प्रशासन) दिलेली आहे. कर चुकविणाऱ्यांविरुद्ध अत्यंत कठोर भूमिका घेत आयकर विभागाने प्रथमच १८ जणांची नावे जाहीर केली आहेत. यात गोल्डसुख ट्रेड व सोमाणी सिमेंटस् कंपनीचा समावेश असून आयकर विभागानुसार या दोघांनी जाणूनबुजून कर भरलेला नाही. या कंपन्यांनी कर भरावा यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने आयकर विभागाला काही दिवसांपूर्वी या १८ जणांची नावे वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यास सांगितले होते. दहा कोटी व त्यापेक्षा जास्त कर जाणूनबुजून न भरणाऱ्यांची नावे यंदा प्रथमच जाहीर करण्यात आली आहेत व त्यातील अनेक जणांचा शोधच लागत नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले. नागरिकांच्या माहितीसाठी आयकर विभागाने या १८ कंपन्यांच्या पॅन क्रमांक व उपलब्ध शेवटचा पत्ताही जाहीर केला आहे. करबुडवेगिरी करणाऱ्यांच्या नावांचा पर्दाफाश करण्याबाबत आयकर खाते वेळोवेळी प्रस्ताव तयार करते व यंदा आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी हे पाऊल उचलले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
देशात १८ सहेतुक कर्जबुडव्या कंपन्या
By admin | Published: April 01, 2015 1:41 AM