- बलवंत तक्षकचंदीगड : हरयाणातील लोकसभा निवडणुकीत यंदा १00 वर्षे पूर्ण केलेले सुमारे ६ हजार मतदार आपला हक्क बजवाणार आहेत. हरयाणातील १0 जागांसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे.राज्याच्या मतदारयादीमध्ये वयाची १00 वर्षे पूर्ण केलेल्या मतदारांची संख्या ५९१0 आहे. यापैकी बहुतेक सर्वांनी यंदाही आपली मतदान करण्याची तयारी व इच्छा असल्याचे बोलून दाखवले आहे. शंभरी ओलांडलेले सर्वाधिक मतदार मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्य कर्नाल जिल्ह्यातील आहेत. त्यांची संख्या ५५३ आहे. पंचकुलामध्ये अशा मतदारांची संख्या सर्वात कमी म्हणजे ११0 आहे.याशिवाय हरयाणामध्ये ९0 ते ९९ या वयोगटातील मतदार आहेत ८९ हजार ७११. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे ७९४६ आहेत भिवानी जिल्ह्यातील.पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील करतार कौर या जगातील सर्वात वयोवृद्ध महिला म्हणून ओळखल्या जातात. त्याही यंदा मतदान करणार आहेत. त्यांना अलीकडेच लुधियानातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि पेसमेकर बसवण्यात आला. त्यावेळी त्यांचे वय ११८ असल्याची नोंद त्यांच्या कुटुंबीयांनी केली. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे करतार कौर यांच्या लहान भावाच्या जन्माचा दाखला आहे. त्यानुसार भावाचे वय ११६ आहे. करतार कौर या त्याच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठ्या आहेत.फिरोजपूरचे उपजिल्हाधिकारी चंद्र गैंद यांनी सांगितले की, करतार कौर यांच्या कुटुंबीयांकडून अर्ज आला आहे. त्यानुसार नगर परिषदेचा आरोग्य विभागातर्फे त्यांना जन्माचा दाखला दिला जाईल. नगर परिषदेकडे केवळ १९५0 पासूनचे जन्माचे दाखले उपलब्ध आहेत. फिरोजपूरमध्ये १९ मे रोजी मतदान होईल.या दोघींचे लाडके नेतेचंदीगडमध्ये १0४ वर्षांच्या प्रकाश देवी व १0१ वयाच्या सुमेरा देवी राहतात. प्रकाश देवी या दिवंगत इंदिरा गांधी यांनाच कायम आपल्या नेत्या मानत आल्या. आज इंदिरा गांधी हयात नसल्या तरी त्यांचे काँग्रेसवरील प्रेम पूर्वीइतकेच आहे. याउलट सुमेरा देवी म्हणतात की, पंतप्रधान मोदी गरीब कुटुंबातून आलेले आहेत. त्यांना गरीबांविषयी कळवळा आहे. चंदीगडमध्येही १९ मे रोजी या दोघी मतदान करणार आहेत.
'या' राज्यात शंभरी गाठलेले तब्बल ६ हजार मतदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 3:47 AM