नवी दिल्ली- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं उपोषण लांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारनं दिलेल्या प्रस्तावात अनेक त्रुटी असल्याचं अण्णांनी भेटीसाठी आलेल्या शिष्टमंडळाच्या लक्षात आणून दिलं आहे. त्यामुळे अण्णांचं उपोषण सुरूच राहणार आहे. अण्णांच्या मागण्यांवर कोणताही तोडगा न निघाल्यानं उपोषण लांबण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन अण्णांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीत आहेत. अण्णा हजारे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये जवळपास तासभर चर्चासुद्धा झाली आहे. केंद्रानं दिलेला प्रस्ताव गिरीश महाजनांनी अण्णा हजारेंपुढे मांडला आहे. परंतु त्या प्रस्तावात अण्णांनी ब-याच त्रुटी दाखवल्या आहेत. त्यामुळे उपोषण लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सरकारकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, असं विधान गेल्या काही वेळापूर्वी अण्णा हजारेंनी केलं होतं. गेल्या पाच दिवसांपासून अण्णा उपोषणाला बसले आहेत. या उपोषणामुळे अण्णांचं जवळपास पाच किलो वजन घटलं आहे. सरकारकडून अद्यापही आंदोलनाची दखल घेतली जात नसल्यानं अण्णा हजारे नाराज आहेत. सरकारकडून जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही, असा निर्धारही अण्णांनी बोलून दाखवला आहे.आमच्या 11 मागण्या अद्यापही मान्य करण्यात आलेल्या नाहीत. 11 मागण्यांपैकी कमीत कमी चार मागण्या तरी मान्य करा. तसेच उर्वरित मागण्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही आम्हाला कालावधी निश्चित करून द्या, असंही अण्णा म्हणाले आहेत. अनेक नेते येऊन भेटत असून, आमची त्यांच्याशी चर्चा सुरू आहे, असंही अण्णांनी स्पष्ट केलं आहे. अण्णांनी उपोषण मागे घ्यावे म्हणून सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.
२३ मार्चपासून अण्णा हजारे यांनी लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दिल्लीच्या रामलीला मैदानात उपोषण सुरू केले आहे. दिल्लीत गेल्यावेळी मिळालेला तेवढा प्रतिसाद मिळत नसला तरी दिल्लीचा उन्हाळा सुरू झाला आहे. वाढत्या तापमानात अण्णांची प्रकृती जास्तच खालावली तर जनप्रक्षोभ उसळण्याची भीती आहे.