राष्ट्रवादीत २ गट नाहीत, वादही नाहीत...; शरद पवार गटाचं निवडणूक आयोगाला उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 01:02 PM2023-08-07T13:02:06+5:302023-08-07T13:03:27+5:30
एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेप्रमाणे अजित पवार यांच्याकडून राष्ट्रवादीवर दावा सांगितला जात आहे.
नवी दिल्ली – महाराष्ट्रात अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २ गट पडल्याचे पाहायला मिळाले. त्यात शरद पवार गटाने विरोधात राहण्याची भूमिका घेतली तर अजित पवार गटाने सत्तेत सहभागी होण्याचं पाऊल उचललं. अजित पवारांच्या या निर्णयाने खरी राष्ट्रवादी कोणाची असा प्रश्न उभा राहिला. अजित पवार यांनी आम्ही राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हासह सरकारमध्ये सहभागी झालोय असा दावा केला होता.
इतकेच नाही अजित पवार गटाने निवडणूक आयोगाला पत्र पाठवले होते. त्यात अजित पवारांनी राष्ट्रवादी अध्यक्षपदी निवड केल्याचे म्हटलं होते. निवडणूक आयोगानेही अजित पवारांच्या पत्रानंतर शरद पवार गटाला पत्र पाठवून म्हणणं मांडण्यास सांगितले होते. आता शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला उत्तर पाठवले आहे. त्यात म्हटलंय की, अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर दावा करणे अकाली आणि दर्दैवी आहे. ही मागणी निवडणूक आयोगाने फेटाळावी असं शरद पवार गटाने सांगितले आहे.
शरद पवार गटाने तर्क लढवला की, अजित पवारांच्या याचिकेतून राष्ट्रवादीत २ गट पडल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. राष्ट्रवादीत कुठला वाद आहे हे सिद्ध करण्यास अजित पवार प्राथमिकदृष्ट्या सक्षम नाहीत. प्रथम दर्शनी निवडणूक आयोगानेही राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षात आणि अजित पवार गटात वाद असल्याचे सिद्ध केले नाही. १.०७.२०२३ च्या आधी अजित पवारांनी शरद पवार अथवा राष्ट्रवादी पक्षाविरोधात कुठलीही तक्रार दिली नव्हती. त्याचसोबत शरद पवार अथवा राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्यांच्या बैठकीत त्यांनी विरोध केला होता असा युक्तिवाद शरद पवार गटाने मांडला आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेप्रमाणे अजित पवार यांच्याकडून राष्ट्रवादीवर दावा सांगितला जात आहे. कारण पक्षातील बहुतांश आमदार अजित पवारांच्या गटात आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वातील गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह द्यावे यासाठी अजित पवार गटाने निवडणूक आयोगाला पत्र पाठवले होते. अजित पवार गटाने सांगितले होते की, ३० जून २०२३ रोजी झालेल्या बैठकीत एनसीपी प्रमुख म्हणून अजित पवारांची निवड केली. ज्यावर पक्षातील सदस्यांनी बहुमताद्वारे स्वाक्षरी केली आहे.
दोन्ही गटात समझौता होणार?
शरद पवारांचे निकटवर्तीय राहिलेले प्रफुल पटेल यांनी अनेकदा मीडियासमोर हा आमच्या पक्षातील अंतर्गत वादावर भाष्य करणार नाही असं म्हटलं. शरद पवार हे आमचे आदर्श आहेत. त्यांनी आमच्या निर्णयाचा आदर करून आम्हाला आशीर्वाद द्यावेत या मागणीसाठी दोनदा अजित पवारांसह सर्व नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यामुळे या दोन्ही गटात भविष्यात समझौता होणार का हे पाहणे गरजेचे आहे.