नवी दिल्ली - ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आल्यानं संपूर्ण जग धास्तावलं आहे. यानंतर ब्रिटन आणि युरोपहून येणाऱ्या विमानांची वाहतूक रोखण्याचा निर्णय अनेक देशांनी घेतला आहे. भारत सरकारनंदेखील कालच ब्रिटनमधून येणारी विमानं रोखण्याचा निर्णय घेतला. ही बंदी ३१ डिसेंबरपर्यंत कायम असेल. कोरोनाचा नवा स्ट्रेन जास्त धोकादायक असल्यानं अनेक देशांकडून खबरदारी घेतली जात आहे. मात्र, भारतात कोरोनाच्या नव्या प्रकाराचा अद्याप एकही रुग्ण नसल्याचं एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी सांगितलंय. तरीही, खबरदारी घेण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली.
गुलेरिया म्हणाले, 'भारतात नव्या प्रकाराच्या विषाणूचं संक्रमण झालेला रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र, आता आढळून येणाऱ्या रुग्णांच्या चाचण्या करणं अत्यावश्यक झालेलं आहे. कारण आतापर्यंत आपण हे बघत होतो की, रुग्ण पॉझिटिव्ह आहे की नाही. आता आपल्याला विषाणूच्या जेनेटिक सीक्वेन्सही बघण्याची गरज पडणार आहे. विशेषतः जे लोक ब्रिटनमधून येत आहेत, त्यांच्यामध्ये नव्या प्रकाराच्या विषाणूचं जेनेटिक सीक्वेन्स तर नाही ना. तसेच, त्यांच्यात हा विषाणू आढळून आला, तर त्यांचं विलगीकरण करून, त्यांची देखरेख जास्त करावी लागणार आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यावर भर द्यावा लागणार आहे. ज्यामुळे सामूहिक स्वरूपात याचा प्रसार होऊ नये,” अशी खबरदारी घेण्याचं गुलेरिया यांनी सांगितलंय. गुलेरिया यांनी आजतक वृत्तवाहिनीशी बोलताना या विषयावर सविस्तर चर्चा केली.
गुलेरिया म्हणाले, ''ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आला आहे. हे कोरोना विषाणूचं नवं स्वरूप आहे. लंडन आणि दक्षिण ब्रिटनमध्ये हा विषाणू आढळून आला आहे. जिथे हा विषाणू आढळून आला, तिथे करोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगानं वाढली आहे. यातून हे दिसून आलं आहे की, हा विषाणू वेगानं पसरत चालला आहे. मात्र, रुग्णांची प्रकृती गंभीर होत नाही. पण ही गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की, हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे लवकर पसरत आहे, त्यामुळे जिथे हा विषाणू पोहोचेल तिथे रुग्णसंख्या वेगानं वाढू शकते. त्यामुळे ब्रिटनहून येणारी विमानं रोखण्यात आली असून तेथून येणाऱ्या व्यक्तींवर विशेष नजर ठेवली जात आहे,” असेही गुलेरिया यांनी सांगितलं. कोविड 20 ट्रेंडिंगमध्ये
सध्याच्या घडीला जगभरात कोरोना लसीवर संधोधन सुरू आहे. अमेरिकेत कोरोनाचा कहर सुरू असल्यानं काही कंपन्यांच्या लसींच्या वापरास परवानगी देण्यात आली आहे. आणखीही काही देशांनी लसीकरणास सुरुवात केली आहे. एकीकडे जग कोविड-१९ संकटातून बाहेर आलं नसताना आता कोविड-२० ची चर्चा सुरू झाली आहे. ट्विटरवर कोविड-२० ट्रेंडिंग आहे. कोविड-२० हॅशटॅग वापरून आतापर्यंत हजारो ट्विट्स करण्यात आली आहेत.