नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनानिमित्त होणारा यंदाचा कार्यक्रम साध्या पद्धतीचा असणार आहे. कोरोनामुळे यंदा ना शालेय विद्यार्थी असतील ना रंगारंग कार्यक्रम. गृह मंत्रालयाने सर्व सरकारी कार्यालये आणि राज्य सरकारे यांना साध्याच पद्धतीने कार्यक्रम साजरा करण्यास सांगितले आहे. याचा परिणाम दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावरही पाहायला मिळेल.
गृह मंत्रालयाचे संयुक्त सचिव अनुज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाल किल्ल्यावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रमही साध्या पद्धतीने होईल. सुरक्षा दलाकडून मोदी यांना गार्ड ऑफ ऑनर. पंतप्रधानांकडून झेंडावंदन, राष्ट्रगीत, २१ तोफांची सलामी आणि पंतप्रधान मोदी यांचे राष्ट्राला उद्देशून भाषण, असे हे कार्यक्रमाचे मर्यादित स्वरूप असणार आहे.
गृह मंत्रालयाचे म्हणणे आहे की, यावेळी आयोजनाची संकल्पना ही आत्मनिर्भर भारत अभियान अशी असेल. कार्यक्रमादरम्यान आणि सोशल मीडिया संदेशात आत्मनिर्भर भारत संकल्पना जनतेत प्रसारित केली जाईल.
पीपीई कीट आणि मास्क
या कार्यक्रमाची जबाबदारी असलेल्या पोलीस आणि केंद्रीय दलाच्या जवानांना पीपीई कीट आणि मास्क असतील. कोरोना वॉरियर्स म्हणजे, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आदी या समारंभात दिसून येतील. याशिवाय कोरोनाची लढाई जिंकलेल्या काही लोकांना बोलविले जाण्याची शक्यता आहे.
एक चतुर्थांश पाहुण्यांनाच निमंत्रण
यंदाच्या कार्यक्रमास सहभागी होणाऱ्या लोकांची संख्या ९०० ते १००० वरून केवळ २०० ते २५० असणार आहे. यात केंद्रीय मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि निवडक निमंत्रक असतील.