नवी दिल्ली : देशाच्या लोकसंख्येत पहिल्यांदाच दर हजार पुरुषांमागे महिलांची संख्या अधिक म्हणजे १०२० इतकी झाली आहे. यापूर्वी दर हजार पुरुषांमागे महिलांची संख्या ९९१ इतकी होती, तसेच एकूण प्रजनन दर २.२ वरून २ पर्यंत खाली घसरला आहे. २०१९ ते २०२१ या कालावधीत केलेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचे (एनएफएचएस) हे निष्कर्ष काढण्यात आले.
या सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये २२ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांशी संबंधित एनएफएचएस - ५चे निष्कर्ष डिसेंबर २०२०मध्ये जाहीर झाले होते. दुसऱ्या टप्प्यामध्ये अरुणाचल प्रदेश, चंदीगड, छत्तीसगड, हरियाणा, झारखंड, मध्य प्रदेश, दिल्ली, ओडिशा, पुुद्दुचेरी, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, उत्तराखंड येथे सर्वेक्षण करण्यात आले. देशातील ७०७ जिल्ह्यांतील सुमारे ६.१ लाख कुटुंबांची पाहणी करण्यात आली. प्रत्येक महिलेने जन्म दिलेल्या अपत्यांची संख्या २.२ वरून २ पर्यंत खाली घसरली आहे. चंदीगडमध्ये हा जननदर १.४ असून, उत्तर प्रदेशमध्ये तो २.४ आहे.
राष्ट्रीय पातळीवर रुग्णालयांत होणाऱ्या प्रसुतीचे प्रमाण ७९ वरून ८९ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. पुद्दुचेरी, तामिळनाडूमध्ये रुग्णालयात होणाऱ्या प्रसुतीचे प्रमाण १०० टक्के आहे. दुसऱ्या टप्प्यांतील १२पैकी ७ राज्ये, केंद्रशासित प्रदेशांत हे प्रमाण ९० टक्के आहे.