ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी कॅशलेस व्यवहार करण्याचा उद्देशाने भारत इंटरफेस फॉर मनी (BHIM) या अॅपचे लाँचिंग केले. सध्या हे भारतातील लोकप्रिय अँड्रॉईड अॅप आहे. यामध्ये सध्या हिंदी आणि इंग्रजी भाषांचा पर्याय देण्यात आल्या असून येत्या काही दिवसात युजर्ससाठी भारतातील सात भाषांचा पर्याय देण्यात येणार आहे. यामध्ये गुजराती, बंगाली, कन्नड, ओडिसा, तमीळ, मल्याळम आणि तेलगू या प्रादेशिक भाषा आहेत.
लाईव्हमिंटने दिलेल्या माहितीनुसार, भीम (BHIM) अॅप वापरणे अधिक सोयीस्कर करण्याच्या दृष्टीने भारतातील आणखी सात भाषांचा यामध्ये समावेश करण्यासंदर्भात अॅप डेव्हलपमेंटला सूचना देण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. तसेच, या सात प्रादेशिक भाषांचा समावेश झाल्यानंतर पुढच्या चार महिन्यात मराठी, पंजाबी, असामी अशा अन्य काही भाषांचा समावेश या अॅपमध्ये करण्यात येणार असल्याचे समजते. दरम्यान, यामुळे आता युजर्सला आपल्याला हव्या त्या भाषेचा पर्याय निवडून व्यवहार करता येणार आहे.
भीम अॅपचे लाँचिंग करण्यात आल्यानंतर अवघ्या 10 दिवसांत गुगल प्ले स्टोरमधून हे अॅप 10 मिलियन युजर्संनी डाऊनलोड केले.