नवी दिल्ली, दि. 26 - मोदी सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यास सांगितलंय का? हा प्रश्न बुधवारी समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी राज्यसभेत विचारला. दुसरीकडे कॉंग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी 1000, 500 आणि 200 रूपयांची नवी नाणी बाजारात येणार असल्याची जोरदार चर्चा असल्याचंही म्हटलं. त्यावर विरोधी पक्षांनी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलींनी यावर स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. मात्र, जेटलींनी यावर काहीही उत्तर देण्यापेक्षा मौन धारण केलं. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद केली असल्याची माहिती असून चालू आर्थिक वर्षात नव्या नोटा बाजारात आणल्या जाणार नाहीत. त्यामुळेच सरकार दोनशे रूपयांच्या नव्या नोटा आणणार असल्याची जोरदार चर्चा आहे. दोनशे आणि पाचशे रूपयांच्या पुरेशा नोटा उपलब्ध झाल्यानंतर सरकार 2 हजारांच्या नोटा बंद करू शकते असं म्हटलं जात आहे. 2 हजारांच्या नोटा बंद केल्यामुळे सामान्य जनतेला त्याचा जास्त त्रास होणार नाही. त्यानंतर दोन हजार रूपयांची साठवणूक करणा-यांवर सरकार कठोर कारवाई करू शकते अशी जोरदार चर्चा आहे. हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार,सध्या जे प्रिंटिंग सुरु आहे त्यामध्ये 90 टक्के 500 च्या नोटांचा समावेश आहे. 500 रुपयांच्या जवळपास 14 अब्ज नोटांची छपाई आतापर्यंत पुर्ण झाली आहे. हा आकडा नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर चलनातून बाद झालेल्या 500 च्या जुन्या नोटांच्या आकड्याच्या आसपास आहे. 500 रुपयांच्या 15.7 अब्ज नोटा चलनातून बाद झाल्या होत्या. म्हैसूरमध्ये 200 रुपयांच्या नव्या नोटांची छपाई सुरु असून पुढील महिन्यात या नोटा बाजारात येतील अशी अपेक्षा आहे. 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली असली तरी 500 च्या नोटांची छपाई सुरु आहे. त्यामुळे 2000 च्या नोटांचा तुडवडा 500 च्या नोटा भरुन काढतील असं सांगण्यात आलं आहे. 20 जुलै रोजी इकॉनॉमिक टाईम्सने देशातील काही शहरांमध्य़े 2000 च्या नोटांचा तुडवडा भासत असल्याचं वृत्त दिलं होतं. 'गेल्या 40 दिवसांपासून आरबीआयने 500 रुपयांच्या नोटांचा पुरवठा सुरु केला असल्याने दोन महिन्यांपुर्वी जाणवणारा नोटांचा तुडवडा भरुन निघाला आहे', अशी माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाचे उप-व्यवस्थापकीय संचालक निरज व्यास यांनी दिली आहे. मात्र यादरम्यान 2000 रुपयांच्या पुरवठ्यात घट झाल्याचंही निदर्शनास आलं असल्याचं त्यांनी सांगितलं.
पुन्हा नोटबंदी? जेटलींचं मौन आणि चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2017 8:41 PM
मोदी सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यास सांगितलंय का? हा प्रश्न बुधवारी समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी राज्यसभेत विचारला.
ठळक मुद्देरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद केली असल्याची माहिती असून चालू आर्थिक वर्षात नव्या नोटा बाजारात आणल्या जाणार नाहीत.दोनशे आणि पाचशे रूपयांच्या पुरेशा नोटा उपलब्ध झाल्यानंतर सरकार 2 हजारांच्या नोटा बंद करू शकते असं म्हटलं जात आहे. 2 हजारांच्या नोटा बंद केल्यामुळे सामान्य जनतेला त्याचा जास्त त्रास होणार नाही. त्यानंतर दोन हजार रूपयांची साठवणूक करणा-यांवर सरकार कठोर कारवाई करू शकते अशी जोरदार चर्चा आहे.