नवी दिल्ली : पाकिस्तानने भारताविरुद्धच्या कारवाया न सोडल्यास त्याला त्याची जबर किंमत मोजावी लागेल, असा इशारा केंद्रीय अरुण जेटली यांनी दिला आहे. आम्ही खूप सहन केले आहे. कोणी आमच्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नये. कारण, सीमेवरील तणाव हाताळण्याबाबतचा आमचा दृष्टिकोन आता बदलला आहे, असेही त्यांनी सुनावले. पाक सातत्याने सीमेवर तणाव वाढवीत आहे. पाक दहशतवादी निर्माण करण्यासह त्यांची आयात-निर्यातही करतो. तो सुधारला नाही तर त्याला याची मोठी किंमत मोजावी लागेल. पाकने सुधारावे यासाठी भारताने मुत्सद्दी स्तरावर प्रयत्न केले. मात्र, पाकच्या भूमिकेत बदल होत नाही त्यामुळे भारताच्या भूमिकेतही आता बदल झाला आहे. आम्ही अधिक सक्रिय भूमिका घेत आहोत, असेही जेटली म्हणाले. आम्ही उरी आणि पठाणकोटचा हल्ला सहन केला. मात्र, पाकने दहशतवादी व लष्कराद्वारे आमच्या लोकांना मारणे सुरू ठेवले तर याची त्याला किंमत मोजावी लागेल, असे ते म्हणाले.पाक सध्या अंतर्गत वादाने बेजार असल्याकडे लक्ष वेधता ते म्हणाले की, पाकने आधी आपले घर दुरुस्त करायला हवे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
पाकला मोठी किंमत मोजावी लागेल
By admin | Published: November 03, 2016 6:25 AM