नवी दिल्ली : गुजरातमध्ये वडोदराच्या रस्ते वाहतूक कार्यालयाला (आरटीओ) गुन्हा शाखेच्या पोलिसांनी विचित्र असा प्रश्न विचारला आहे. एका बलात्कार प्रकरणाचा तपास करीत असलेल्या स्थानिक गुन्हा शाखेने आरटीओला विचारले की, स्पोर्ट्स यूटिलिटी व्हेईकलमध्ये (एसयूव्ही) बलात्कार केला जाऊ शकेल एवढी जागा असते का? बलात्कार घडलेल्या एखाद्या प्रकरणात एखाद्या वाहनाचा तपास करण्याची विनंती केली जाण्याची ही पहिली घटना आहे. ज्या एसयूव्हीबद्दल तपास होत आहे तिचा मालक भद्र पटेल असून तो पाडरा नगरपालिका आणि कृषी उत्पन्न मंडईचा माजी संचालक आहे. पटेलवर वेगवेगळ्या १८ आरोपांवरून गुन्हे दाखल आहेत. कोणत्याही अपघातानंतर पोलीस आरटीओला फक्त वाहनाच्या फिटनेस सर्टिफिकेटबाबत सूचना देतात. वाहनात किती जागा आहे याची माहिती विचारत नाहीत.
प्रकरण काय?बलात्काराची घटना २६ व २७ एप्रिलच्या रात्री घडली. पोलिसांकडे तक्रार आली ३० तारखेला. आरोपीला २ मे रोजी राजस्थानात अटक झाली. पटेल सध्या न्यायालयीन काेठडीत आहे. तक्रारीनुसार पटेल आणि महिला एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून एकमेकांना ओळखत होते, महिला २६ एप्रिलच्या रात्री पार्टीत सहभागी होती. तिने रात्री तिच्या मित्राला मला घेऊन जा, असे सांगून बोलावले. मित्राने पटेलला पाठवले. पटेल महिलेला निर्जन स्थळी घेऊन गेला व त्याने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. नंतर त्याने तिला निर्जन स्थळी नेले व बलात्कार करून तिला घरी सोडले.