सखोल अभ्यास केला, महाराष्ट्राच्या निवडणुकीत गडबड झालीय; राहुल गांधी-सुळे-राऊतांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 13:43 IST2025-02-07T13:42:59+5:302025-02-07T13:43:34+5:30
महाविकास आघाडीच्या तीन नेत्यांनी नवी दिल्ली इथं पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

सखोल अभ्यास केला, महाराष्ट्राच्या निवडणुकीत गडबड झालीय; राहुल गांधी-सुळे-राऊतांचा आरोप
Maharashtra Assembly Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीतील काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत या तीन नेत्यांनी नवी दिल्ली इथं पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. "महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काहीतरी गडबड झाली असल्यानेच आम्ही विचारलेल्या प्रश्नांना निवडणूक आयोगाकडून उत्तर दिलं जात नाही," असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत राहुल गांधी म्हणाले की, "महाराष्ट्रात पाच वर्षांत जितक्या नव्या मतदारांची नोंद झाली नाही, त्यापेक्षा अधिक मतदार शेवटच्या पाच महिन्यांत नोंदवले गेले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान ३९ लाख नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली. म्हणजे हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येपेक्षाही अधिक मतदार या कालावधीत नोंदवण्यात आले. हे मतदार नेमके आले कुठून?" असा सवाल राहुल यांनी उपस्थित केला आहे.
"सरकारच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील प्रौढ लोकसंख्या ९. ५४ कोटी इतकी आहे. मात्र निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे की महाराष्ट्रात ९.७० कोटी इतके मतदार आहेत. म्हणजे महाराष्ट्रातील एकूण प्रौढ लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या अधिक असल्याचा दावा आयोगाने केला आहे. विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी ६ वाजल्यानंतर तब्बल १२ टक्के मतदान वाढल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे. आम्ही मागील काही दिवसांत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालाचा सविस्तर अभ्यास केला आहे. या निवडणुकीत काहीतरी गोंधळ नक्कीच झाला आहे. महाराष्ट्रातील मतदार याद्यांमध्ये अनियमितता आढळली आहे," असा आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे.
दरम्यान, "लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील मतदारांची यादी फोटोसह आम्हाला देण्यात यावी, अशी आम्ही महाविकास आघाडीतील तीनही पक्ष निवडणूक आयोगाकडे मागणी करत आहोत. मात्र काहीतरी चुकीचं असल्यामुळेच आयोगाकडून आम्हाला मतदार याद्या दिल्या जात नाहीत," असंही राहुल गांधी म्हणाले.