सुरेश के. डुग्गर,
श्रीनगर- अमरनाथ यात्रेला दहशतवाद्यांचा धोका आहे की नाही यावरून आता वाद सुरू झाला असून, भारतीय लष्कराने धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे. हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वाणी यांनी मध्यंतरी स्वत:चा एक व्हिडीओ प्रसारित करून अमरनाथ यात्रेकरूंना अजिबात त्रास होणार नाही, याची ग्वाही दिली होती. मात्र बीएसएफच्या एका वाहनावर झालेल्या हल्ल्यात तीन जवान मरण पावल्यानंतर अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याची ही पूर्वतयारी असल्याचे जाहीर केल्यामुळे वाद वाढला आहे आणि यात्रेकरूंमध्येही काहीशी घबराट आहे.गेल्या आठवड्यात बीएसएफच्या वाहनांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला, ज्यात तीन जवान मरण पावले. त्यानंतर लगेच बीएसएफच्या महासंचालकांनी हा हल्ला म्हणजे यात्रेकरूंवरील हल्ल्याची तयारी सुरू असल्याचे प्रतिपादन केले. त्यानंतर हिजबुल मुजाहिद्दिनने बुरहान वाणीचा व्हिडीओ प्रसारित करून, आम्ही अमरनाथ यात्रेकरूंवर हल्ला करण्याच्या विरोधात असल्याचे सांगितले. लष्कराच्या व्हिक्टर फोर्सचे जीओसी मेजर जनरल अशोक नरोला यांनीही यात्रेकरूंवर हल्ल्याची शक्यता फेटाळून लावली. पण त्यांच्या वरील विधानानंतर वाद मिटण्याऐवजी वाढला आहे. दहशतवादी आणि भारतीय लष्कर हल्ल्याची शक्यता अमान्य करीत असतानाच केंद्रीय गृह मंत्रालयाने अधिक सुरक्षा दले पाठवण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षीपेक्षा अधिक प्रमाणात केंद्रीय सुरक्षा दले दाखल होत आहेत. राज्य सरकारने निमलष्कराच्या १00 तुकड्या मागवल्या असताना, केंद्राने १२५ तुकड्या पाठवल्या आहेत. लष्कर आणि बीएसएफ यांच्यातील मतभेद तसेच केंद्र सरकारने पाठविलेल्या अधिक तुकड्या यामुळे अमरनाथ यात्रेकरूंच्या मनात काहीसे भीतीचे वातावरण आहे. अमरनाथ यात्रेच्या काळात अनेकदा हवामान बिघडण्याची आणि नैसर्गिक आपत्तीची शक्यता असते. ही बाब लक्षात घेत, यंदा राष्ट्रीय आपत्ती सहाय्य पथकेही इथे दाखल झाली आहेत. अमरनाथ यात्रेच्या रस्त्यांवर ती दिसू लागली आहेत.>क्षीर भवानी यात्रा : काश्मिरी पंडितांची गर्दीयंदा रमजानच्या काळातच क्षीर भवानी यात्रा होत असून, त्यासाठी गंदरबल जिल्ह्यातील तुलमल्ला गावात काश्मिरी पंडितांची गदी आतापासूनच सुरू झाली आहे. काश्मिरी पंडितांना पुन्हा खोऱ्यात वसविण्याची चर्चा सुरू असतानाच, बाहेर राज्यांतील अनेक काश्मिरी पंडितही यंदा इथे दाखल झाले आहे. अमरनाथ यात्रेनंतर क्षीर भवानी देवीची यात्रा महत्त्वाची मानली जाते. ही यात्रा दरवर्षी मे ते जुलैच्या दरम्यान होते.