नवी दिल्ली : देशामध्ये कोरोनातून बरे झालेल्यांचा आकडा १ कोटी ६ लाख २१ हजार झाला असून त्यांचे प्रमाण ९७.२९ टक्के आहे. सोमवारी कोरोनामुळे ९० जण मरण पावले असून, ही संख्या १०० पेक्षा कमी असण्याची या महिन्यातील नववी वेळ आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्याही तुलनेने कमी आहे. देशात कोरोनाचे १०९१६५८९ रुग्ण असून त्यातील १०६२१२२० जण बरे झाले. सोमवारी कोरोनाचे ११६४९ नवे रुग्ण सापडले, तर ९४८९ जण बरे झाले. देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या १३९६३७ असून त्यांचे प्रमाण १.२८ टक्के आहे. कोरोना बळींची एकूण संख्या १५५७३२ तर कोरोना रुग्णांचा मृत्युदर १.४३ टक्के झाला आहे. सौदी अरेबियाने भारतासह २० देशांतील प्रवाशांना तात्पुरती प्रवेशबंदी लागू केली. हा आदेश २ फेब्रुवारीपासूनच लागू झाला आहे. सौदी अरेबियामध्ये ३ लाख ७१ हजारांपेक्षा अधिक रुग्ण असून ६४०० पेक्षा अधिक लोकांचा बळी गेला.
मात्र हे करायलाच हवेते म्हणाले की, लसीकरणाची मोहीम सुरू आहे. मात्र लोकांनी फिजिकल डिस्टन्स पाळणे व मास्क वापरणे आवश्यकच आहे. या दोन बाबी म्हणजे एका अर्थी सामाजिक लसच आहे. या दोन गोष्टींचे पालन केल्यास कोरोनाचा संसर्ग टाळता येईल.
आणखी १९ लसी लवकरच -डॉ. हर्षवर्धन
- कोरोनाविरोधी आणखी १८ ते १९ लसी जवळपास तयार असून, त्यांच्या चाचण्या सुरू आहेत, अशी माहिती देतानाच, भारतातून २० ते २५ देशांना लसींची निर्यात करण्यात येणार असल्याची माहितीही केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सोमवारी दिली. देशातील ५० वर्षे वयावरील लोकांना दोन ते तीन आठवड्यांत लस देणे सुरू होईल, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
५० वर्षे वयावरील सुमारे २७ कोटी लाेकांना कोरोना लस देण्याच्या दृष्टीने पूर्ण तयारी झाली आहे. दोन ते तीन आठवड्यांत देशभर तिसऱ्या टप्प्यातील मोहीम सुरू होईल. सध्या ज्या दोन लसी दिल्या जात आहेत, त्यांच्या उपयुक्ततेविषयी उपस्थित केल्या जाणाऱ्या सर्व शंका निराधार असल्याचा दावा त्यांनी केला. ते म्हणाले की, या लसींची उपयुक्तता वा क्षमता याआधीच सिद्ध झाली आहे.
१८८ जिल्ह्यांत गेल्या सात दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. तसेच गेल्या २१ दिवसांत २१ जिल्ह्यांमध्ये एकालाही या आजाराची लागण झालेली नाही.