नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या नेपाळ दौऱ्यावर आहेत. एका लग्न सोहळ्यासाठी ते नेपाळला गेले आहेत. तिथे ते एका पबमध्ये गेल्याचा व्हिडीओ समोर आला. त्यावरून भाजपनं राहुल यांच्यावर टीकेची झोड उठवली. या टीकेला काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे.
पंतप्रधान मोदींच्या नव्या विमानात स्विमिंग पूल आहे. त्यात आंघोळ करत करत ते परदेशी जातात, असं चौधरींनी म्हटलं आहे. भाजप राहुल गांधींना घाबरतो. त्यामुळे त्यांच्यावर सातत्यानं टीका केली जात, असं चौधरी बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये पत्रकार परिषद घेत म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी १३ हजार कोटी रुपयांत दोन विमानं खरेदी केली आहेत. त्यात स्विमिंग पूल आहे. ते (मोदी) त्यात आंघोळ करत करत परदेशी जातात आणि भाषणं देऊन परत येतात, असं विधान चौधरींनी केलं. राहुल गांधी नेपाळला त्यांच्या मैत्रिणीच्या लग्नासाठी गेले आहेत. नेपाळला जाण्यासाठी त्यांनी स्वत:च्या खिशातून पैसे खर्च केले आहेत, असं चौधरींनी सांगितलं.
नेपाळ आपला शेजारी देश आहे. तिथे जाण्यास कोणतीही बंदी नाही. भाजप यावरूनही राहुल गांधींना लक्ष्य करत आहे. त्यावरून भाजप राहुल यांना किती घाबरतो, तेच दिसून येतंय, असं प्रत्युत्तर चौधरींनी दिलं. राहुल यांच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर भाजपकडे नाही. राहुल यांच्या एकाही प्रश्नाला उत्तर देणं पंतप्रधान मोदींनादेखील जमलेलं नाही, असंही चौधरी यांनी म्हटलं.