गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानला लष्कराची, संरक्षण संबंधी गोपनिय कागदपत्रे पुरविल्याची प्रकरणे उघडकीस येत आहेत. या प्रकरणाची एकेक कडी जोडत केंद्रीय गुप्तचर संस्था बंगळुरूपर्यंत पोहोचल्या आहेत. भारताची नवरत्न कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) च्या एका कर्मचाऱ्याला पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. यामुळे भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये खळबळ उडाली आहे.
दीप राज चंद्रा असे या अधिकाऱ्याचे नाव असून तो भेलमध्ये उत्पादन विकास आणि संशोधन केंद्रामध्ये काम करतो. चंद्रा हा मुळचा उत्तर प्रदेशातील गाझियाबादचा आहे, काही दिवसांपूर्वी तपास यंत्रणांनी कानपूर ऑर्डनन्स फॅक्टरीच्या एका कनिष्ठ कार्य व्यवस्थापकाला पाकिस्तानी स्पायसोबत गुप्त माहिती लीक केल्याच्या आरोपाखाली पकडण्यात आले होते. याचे धागेदोरे आता खोलवर रुजल्याचे सापडू लागले आहे. उत्तर प्रदेश ATS ने १४ मार्च रोजी रवींद्र कुमार या कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले होते. त्याकडून ही माहिती मिळाली आहे.
त्यापूर्वी १८ फेब्रुवारी रोजी, राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) अधिकाऱ्यांनी कर्नाटकातील कारवार नौदल तळाशी संबंधित संवेदनशील माहिती पाकिस्तानला लीक केल्याच्या संदर्भात दोन व्यक्तींना अटक केली होती. भारत इलेक्ट्रॉनिक्सची कोणती कागदपत्रे लीक केली याची माहिती मिळू शकली नाहीय. परंतू भेल सध्या भारतीय हवाई दलासाठी विविध प्रकारची घातक शस्त्रास्त्रे बनविण्याचे काम करत आहे. तसेच ड्रोन, लढाऊ विमाने बनविण्याचे कामही प्रगतीपथावर आहे. यामुळे ही माहिती लीक झाल्याने देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.
हैदराबादहून येत केंद्रीय पथकाने राज्याच्या पथकांची मदत घेत ही कारवाई केली आहे. या चंद्राला बंगळुरूमधून ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील चौकशीसाठी त्याला हैदराबादला नेण्यात येणार आहे. या चौकशीत आणखी किती जणांची नावे उघड होतात, तसेच पाकिस्तानी गुप्तहेरांनी किती खोलवर आपले जाणे विणले आहे याची माहिती उघड होणार आहे.