नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. एकीकडे देशातील मणीपूर राज्यात हिंसाचार होत असताना दुसरीकडे पंतप्रधान विदेश दौऱ्यावर जात आहेत. मात्र, मणीपूरला भेट देत नाहीत, यावरुन विरोधकांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मणीपूर जळत असताना मोदी अमेरिकेला जात असल्याचं सांगत टीका केली. दरम्यान, रविवारी मोदींचा मन की बात कार्यक्रम झाला. मात्र, या कार्यक्रमात मणीपूर की बात झालीच नाही, म्हणून मणीपूरच्या लोकांनी संताप व्यक्त केला.
मणीपूरमध्ये गेल्या ४९ दिवसांपासून हिंसाचार सुरू असून अनेकांनी आपला जीव गमावला आहे. तर, सार्वजनिक व खासगी संपत्तीचं मोठं नुकसानही झालं आहे. वाशिंक दंगलीत मणीपूरमधील हिंसाचार अद्यापही सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याअमेरिका दौऱ्यावर काँग्रेससह विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे. मणीपूरच्या मुद्द्यावर मोदी अमेरिका दौऱ्यापूर्वी मौन सोडतील, असे काँग्रेसचे महासचिव के.सी वेणूगोपाल यांनी म्हटले. तर, रविवारी झालेल्या मन की बात कार्यक्रमातही मोदी मणीपूरबद्दल काहीही बोलले नाहीत, त्यावरुन मणीपूरमधील नागरिकांनी संताप व्यक्त केलाय.
मोदी सरकारचा विरोध करत रविवारी मन की बात कार्यक्रमानंतर मणीपूरमधील लोकांनी रेडिओची तोडफोड करत निषेध व्यक्त केला. पंतप्रधान मोदींनी अद्याप पूर्वेत्तर राज्यातील हिंसाचारावर किंवा मणीपूरबद्दल कुठेही विधान केलं नाही. त्यातच, रविवारी मन की बात कार्यक्रमात मोदी मणीपूरबद्दल काहीतरी बोलतील, असं अनेकांना वाटत होतं. मात्र, या कार्यक्रमातही मणीपूरचा साधा उल्लेखही झाला नाही. त्यामुळे, संतप्त नागरिकांनी रेडिओ फोडून मन की बात कार्यक्रमास विरोध दर्शवला.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असून उद्या २१ जून रोजी जागतिक योग दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा पाहुणचार स्विकारून ते येथील संसदेत भाषणही करणार आहेत.