Acharya Pramod Krishnam : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट आणि पक्षविरोधी टिप्पणी केल्यामुळे काँग्रेसने आचार्य प्रमोद कृष्णम यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. त्यांनी अलीकडेच अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले होते. तसेच, या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याबद्दल आपल्याच काँग्रेस पक्षातील नेत्यांवर टीका केली होती. आता पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर प्रमोद कृष्णम यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
प्रमोद कृष्णम यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट शेअर करत काँग्रेसवर निशाणा साधला. "राम आणि राष्ट्र, याबाबत तडजोड होऊ शकत नाही," अशी पोस्ट त्यांनी केली आणि या पोस्टमध्ये राहुल गांधी यांनाही टॅग केले. विशेष म्हणजे, त्यांची पोस्ट रिट्विट करत कवी कुमार विश्वास यांनी विनय पत्रिकेतील तुलसीदासांच्या काही ओळी लिहिल्या.
पक्षातून हकालपट्टी का केली?काँग्रेसचे म्हणणे आहे की, आचार्य प्रमोद कृष्णम यांना शिस्तभंग आणि पक्षाविरोधात वारंवार वक्तव्ये केल्यामुळे हकालपट्टी करण्यात आली. मात्र, पक्षाने या निर्णयामागचे विशिष्ट कारण सांगितलेले नाही. काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, काँग्रेस अध्यक्षांनी प्रमोद कृष्णम यांची पक्षविरोधी विधाने आणि अनुशासनहीनतेच्या तक्रारींमुळे त्यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे.
दरम्यान, आचार्य प्रमोद यांचे म्हणणे आहे की, त्यांची पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट, त्यांना कल्की धामच्या उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यासाठी होती. त्यांनी मुख्यमंत्री योगी यांचीही भेट घेतली होती. तेव्हापासून आचार्य प्रमोद भाजपमध्ये प्रवेश करू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.
कोण आहेत आचार्य प्रमोद कृष्णम?आचार्य प्रमोद कृष्णम यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक लखनऊमधून काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती, परंतु मोदी लाटेसमोर ते टिकू शकले नाहीत आणि त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, आचार्य प्रमोद यांना 1 लाख 40 हजार मते मिळवण्यात यश आले. यापूर्वी त्यांनी 2014 ची लोकसभा निवडणूक संभलमधून लढवली होती, पण येथेही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. आचार्य प्रमोद हे याआधी काँग्रेसच्या उत्तर प्रदेश सल्लागार परिषदेचा एक भाग होते, जी प्रियांका गांधी वाड्रा यांना पक्षाच्या यूपी प्रभारी म्हणून मदत करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती. प्रियांका गांधी यांच्या जवळच्या नेत्यांपैकी ते एक असल्याचे बोलले जाते.