- आदेश रावलनवी दिल्ली - हरयाणातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसशी युती न करता आप स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. ही माहिती आपच्या सूत्रांनी शुक्रवारी दिली. जागा वाटपासाठी झालेल्या चर्चेमध्ये दोन्ही पक्षांना मान्य होईल, असा तोडगा न निघाल्याने आपने हा निर्णय घेतल्याचे समजते. त्या राज्यात विधानसभेच्या ५० जागा लढविण्याचा निर्णय आपने घेतला आहे. दोन पक्षांची युती होण्यास हरयाणातीलकाँग्रेस नेत्यांचाही विरोध होता.
लोकसभेत हरयाणामध्ये आपला फक्त एका जागेवर विजय मिळाला होता. आप काँग्रेसकडे नऊ जागांची मागणी करत होते. काँग्रेसने आपला ४, सपाला एक, सीपीआयएमला एक जागा देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, आपला ते मान्य नसल्याने काँग्रेसबरोबरची बोलणी फिस्कटली.
काँग्रेस नेत्यांनाही आपशी युती मंजूर नव्हती. आप अधिक जागा मागत आहे, असा नेत्यांचा आक्षेप होता. काँग्रेसच्या सर्वेक्षणानुसार, आपला २ टक्क्यांहून कमी मते मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसने आपशी युती करण्यास नकार दिला.
तिकीट नाकारल्यास नेते पक्ष सोडून जाण्याची शक्यताआप, काँग्रेस हे इंडिया आघाडीचे घटक पक्ष आहेत. ते लोकसभा निवडणुकीत हरयाणा, गुजरात, दिल्ली येथे एकत्र लढले होते. लोकसभा निवडणुकीत आपला कुरूक्षेत्र मतदारसंघ देण्यात आला होता. हरयाणा आपचे प्रदेशाध्यक्ष सुशील गुप्ता यांना या मतदारसंघात भाजपचे उमेदवार नवीन जिंदाल यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. निवडणुकीत तिकीट वाटपाच्या मुद्यावरून सत्ताधारी भाजप व विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला आपल्याच पक्षातील नेत्यांकडून विरोध पत्करावा लागत आहे. तिकीट न मिळाल्यास आम्ही भाजपला रामराम करू, असे विद्यमान आमदार, काही भाजप नेत्यांनी जाहीर केले आहे.
उमेदवारी न मिळल्याने आमदार ढसाढसा रडताहेत- भाजपने हरयाणात अनेकांजे तिकीट कापले आहे. भाजपाने आमदार शशी रंजन परमार यांनाही तिकीट दिलेले नाही. त्यामुळे ते मोठमोठ्याने रडू लागल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसते. - मला वाटत होते की, पक्ष मला तिकीट देईल. पण आता मी काय करू? माझ्याबरोबर पक्षाने जो व्यवहार केलाय ते पाहून मला खूप वेदना होत आहेत. मला कळत नाहीये, पक्षात हे कसले निर्णय घेतले जात आहेत, असे म्हणाले. अनेक आमदारांचे असे रडतानाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
काँग्रेसला ३५ ते ४०, भाजपला २६ ते ३६ जागा?हरयाणात पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियातील एका यूजरने बनावट जनमत चाचणीचे ग्राफिक झळकवले होते.त्यानुसार या राज्यातील ९० विधानसभा जागांपैकी भाजपला २६ ते ३६ जागा, काँग्रेसला ३५ ते ४० जागा व आम आदमी पक्षाला १५ ते २० जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे, असे म्हटले होते. या जनमत चाचणीच्या ग्राफिक्सची सत्यता पीटीआय तपासली. त्यावेळी रिपब्लिक टीव्ही-मॅट्रिक्सने अशा प्रकारची कोणतीही जनमत चाचणी केली नव्हती, असे सत्य उजेडात आले आहे.