"मिस इंडियाच्या यादीत कुणीच दलित, आदिवासी, OBC नाही’’, राहुल गांधींचा दावा, भाजपाची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2024 03:34 PM2024-08-25T15:34:56+5:302024-08-25T15:35:33+5:30
Rahul Gandhi: मिस इंडियाच्या (Miss India) विजेत्यांची यादी पाहिली तेव्हा त्यामध्ये मला कुणी, दलित, आदिवासी किंवा ओबीसी नावं दिसली नाहीत, असं विधान राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलं होतं. आता या विधानाविरोधात भाजपानं (BJP) आक्रमक भूमिका घेतली होती. आता राहुल गांधी यांच्या विधानाविरोधात भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे.
आरक्षण आणि जातिनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे कमालीचे आक्रमक झालेले आहेत. दरम्यान, नुकतंच एका कार्यक्रमामध्ये संबोधित करताना राहुल गांधी यांनी मिस इंडियाच्या विजेत्यांची यादी पाहिली तेव्हा त्यामध्ये मला कुणी, दलित, आदिवासी किंवा ओबीसी नावं दिसली नाहीत, असं विधान केलं होतं. आता या विधानाविरोधात भाजपानं आक्रमक भूमिका घेतली होती. आता राहुल गांधी यांच्या विधानाविरोधात भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपाचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी राहुल गांधी यांचं विधान हे फुटीरतावादी आणि खोटारडेपणाचं असल्याचा आरोप केला आहे. तर भाजपा नेते अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर एक फोटो काँग्रेसला टॅग करून यामधील एससी, एसटी आणि ओबीसी समुदायातील एक तरी व्यक्ती शोधून दाखवा, असं आव्हान दिलं आहे.
या विधानावरून राहुल गांधींवर टीका करताना अमित मालवीय यांनी बालकबुद्धीचं राजकारण ही एक फसवणूक आहे, असा टोला लगावला आहे. त्यानंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनीही राहुल गांधींवर टीका केली आहे. त्यात ते म्हणाले की, आता राहुल गांधी यांना मिस इंडिया, चित्रपट, खेळ यामध्येही आरक्षण हवं आहे का, हा केवळ बालबुद्धीचा मुद्दा नाही तर जे त्यांना प्रोत्साहन देतात, तेसुद्धा यासाठी जबाबदार आहेत.
दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावरून बोलताना राहुल गांधी म्हणाले होते की, मी मिस इंडियाची यादी पाहिली. त्यामध्ये कुणीही दलित, आदिवासी किंवा ओबीसी महिला नाही आहे. काही लोक क्रिकेट किंवा बॉलिवूडबाबत बोलतील. कुणी मोची किंवा प्लंबरला दाखवणार नाही. एवढंच नाही तर प्रसारमाध्यमांमधील आघाडीच्या अँकर्समध्येही ९० टक्क्यांमधील कुणी नाही आहे, असा दावाही राहुल गांधी यांनी केला होता.
तर भाजपाचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी एका महिलेला विजेतेतेपदाचा मुकूट प्रदान करतानाचा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर करत राहुल गांधी यांना टोला लगावला आहे. त्यात त्यांनी लिहिलं की, दोन वर्षांपूर्वी छत्तीसगडमधील एक आदिवासी युवती, मिस रिया एक्का हिने मिस इंडियाचा पुरस्कार जिंकला होता. राहुल गांधी सध्या खेळत असलेला डाव हा फुटिरतेकडे जाणारा आणि खोटारडेपणाचा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.