Rahul Gandhi : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज सीलमपूरमधून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. आपल्या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांवर जोरदार टीका केली. 'मोदी आणि केजरीवाल यांच्यात फरक नाही. प्रचारात आणि खोटी आश्वासने देण्यात दोघेही सारखेच आहेत,' अशी टीका राहुल गांधींनी केली.
राहुल गांधी पुढे म्हणतात, 'द्वेषाचा प्रेमानेच पराभव केला जाईल. भाजप आणि आरएसएसचे लोक संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. नरेंद्र मोदी आंबेडकरांच्या संविधानावर दररोज हल्ला करतात. काहीही झाले तरी, आम्ही या संविधानाचे रक्षण करू. माझ्या आणि काँग्रेसच्या राजकारणात स्पष्टता आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे, प्रेमानेच द्वेषावर मात केली जाईल. जर एखाद्या भारतीयावर अन्याय झाला, तो कोणत्याही धर्माचा असो, मी त्याचे संरक्षण करीन,' असं राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधींचा केजरीवालांवर निशाणा'आज 150 श्रीमंत लोक देशाला चालवत आहेत. अरविंद केजरीवाल कधी अदानीविरोधात बोलताना दिसतात का? पण मी स्पष्ट बोलतो. आम्ही देशाला एका उद्योगपतीवर अवलंबून राहू देणार नाही. मी जेव्हा जातीय जनगणनेबद्दल बोलतो, तेव्हा मला मोदी आणि केजरीवाल, या दोघांकडून एकही शब्द ऐकू येत नाही. केजरीवाल जात जनगणनेला समर्थन करतात का?' असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला.