आता पेट्रोल, डिझेल रडवणार! तेल कंपन्या भाव वाढवणार; जाणून घ्या किती दरवाढ होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 02:57 PM2022-02-28T14:57:55+5:302022-02-28T15:00:36+5:30
सौदी-रशियाची मैत्री भारतीयांचं बजेट बिघडवणार; १० मार्चपासून खिशावर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता
नवी दिल्ली: खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे दर दिवसागणिक वाढत आहेत. रशिया आणि युक्रेनच्या संघर्षामुळे खनिज तेलाचे दर वाढले आहेत. खनिज तेलाचे दर बॅरलमागे १०० डॉलरच्या वर गेले आहेत. भारतीय तेल कंपन्यांचा तोटा वाढत चालला आहे. मात्र गेल्या अनेक आठवड्यांपासून कंपन्यांनी दरनवाढ केलेली नाही. सध्या लीटरमागे कंपन्यांना १० रुपयांचं नुकसान सहन करावं लागत आहे.
सध्या देशातील ५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. ७ तारखेला शेवटच्या टप्प्यातील मतदान पूर्ण होईल. त्यानंतर १० मार्चला निवडणुकीचा निकाल लागेल. यानंतर इंधनाचे दर वाढू शकतात. सौदी अरेबियाचे राजे मोहम्मद बिन सलमान यांनी कालच फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅनुएल मॅक्रॉन यांच्याशी संवाद साधला. आम्ही ओपेक प्लस देशांसोबत असल्याचं सलमान यांनी सांगितलं. ओपेक प्लस देशांच्या सदस्यांची येत्या बुधवारी बैठक होत आहे. यामध्ये खनिज तेलाचं उत्पादन वाढवण्याबद्दल विचार होईल.
आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीनं सौदी अरेबियाला आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर स्थिर करण्यासाठी खनिज तेलाचं उत्पादन वाढवण्याचं आवाहन सौदी अरेबियाला केलं होतं. याआधी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनीही सौदीचे राजे सलमान बिन अब्दुल अझिझ यांना याबद्दल चर्चा करण्यासाठी बोलावलं होतं. मात्र यानंतरही सौदीनं तेलाचं उत्पादन वाढवण्यास नकार दिला.
ओपेक प्लसमध्ये १३ देशांचा समावेश होता. ज्याचं नेतृत्त्व रशियाकडे आहे. जगातील तेल उप्तादनात या गटाचा वाटा ४४ टक्के आहे. जगातील राखीव तेलाचा ८१.५ टक्के साठा त्यांच्याकडे आहे. त्यामुळेच तेलाच्या दरांवर त्यांचा जास्त प्रभाव आहे. तेलाचे दर चढे राहिल्यास त्याचा फायदा रशियाला होईल. तेल निर्यातीत रशियाचा क्रमांक तिसरा आहे. तेलाचे दर अधिक असल्याला रशियाला जास्त महसूल मिळेल. त्यामुळे अमेरिकेसह युरोपियन देशांनी घातलेल्या निर्बंधांचा रशियावर फारसा परिणाम होणार नाही.