सुरत - मुंबई दौऱ्यावर येण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी (४ सप्टेंबर) गुजरात दौऱ्यावर असताना आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. काही लोक सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना मागच्या दाराने गुजरातच्या राजकारणात उतरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा शाह यांनी केला. मेधा पाटकर यांनी राज्याची जीवनवाहिनी असलेल्या नर्मदा प्रकल्पाला विरोध केला होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत 'आप'ने नर्मदा बचाव आंदोलनाच्या संस्थापक सदस्य पाटकर यांना मुंबईच्या ईशान्य मतदारसंघातून उमेदवारी दिली होती.
गृहमंत्री अमित शाह म्हणाले, नर्मदा प्रकल्पाला विरोध करणाऱ्या मेधा पाटकर यांना मागच्या दाराने गुजरातच्या राजकारणात उतरवण्यासाठी काही लोकांनी नवी सुरुवात केली आहे. मला गुजरातच्या तरुणांना विचारायचंय, नर्मदा प्रकल्पाला तसेच गुजरातच्या विकासाला विरोध करणाऱ्यांना राज्यात येऊ देणार का?" असा सवाल त्यांनी विचारला. विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी गुजरातमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ३६व्या राष्ट्रीय खेळांच्या उद्घाटन समारंभात अमित शाह एका सभेला संबोधित करत होते.
गुजरातला विरोध करणाऱ्यांना जागा नाही"ज्यांना गुजरात आणि आपली जीवनवाहिनी नर्मदा प्रकल्पाला विरोध करणार्या मेधा पाटकरांना आणायचे आहे. ते प्रत्येक व्यासपीठावर गुजरातला बदनाम करण्याची एकही संधी सोडत नाहीत, त्यांनी हे थांबवायला हवं. गुजरातचा विरोध करणाऱ्यांना कुठलीही जागा नाही. गुजरातच्या जनतेवर माझा विश्वास आहे राज्याला विरोध करणाऱ्यांना ते कदापि स्वीकारणार नाही असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला.
गेल्या २० वर्षांत गुजरातचा अनेक क्षेत्रात विकास मोदींच्या नेतृत्वाखाली गुजरातमध्ये रस्ते आणि बंदरे यासारख्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यात आला आहे. २४ तास वीजपुरवठा दिला जात आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करण्यात आला आहे. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गुजरातने गेल्या २० वर्षात अनेक क्षेत्रांत विकास केला आहे आणि असे रेकॉर्ड प्रस्थापित केले आहेत जे कदाचित येत्या काही दशकात मोडता येणार नाहीत असंही अमित शाह म्हणाले.