नवी दिल्ली - आपल्या ९० मिनिटां भाषणात मोदींनी गेल्या १० वर्षांतील यश आणि देशाचे पुढील मार्गक्रमण आदी गोष्टींवर भाष्य केले. तसेच, घराणेशाही आणि भ्रष्टाचाराचा उल्लेख करत नाव न घेता काँग्रेसवर निशाणा साधला. यावेळी मोदींनी आगामी लोकसभा निवडणुकीचीही बिजे रोवली. तर, पुढच्या वर्षीही १५ ऑगस्टला आपणच झेंडावंदन करू, असा विश्वास व्यक्त केला. या सोहळ्याला विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. तर, मोदींच्या भाषणावर काँग्रेसच्या खर्गेंनी प्रतिक्रिया दिली. तसेच, माजी लोकसभा सभापती मीरा कुमार यांनीही मोदींच्या भाषणावर पलटवार केला आहे.
मोदींनी आपल्या भाषणात तीन कमिटमेंट सांगितल्या. त्यामध्ये परिवारवाद, भ्रष्टाचार आणि तुष्टीकरणावर भाष्य करत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तीस वर्षांनी देशाला बहुमताचे, ताकदवर सरकार हवे असे जनतेला वाटले होते. आज देशात तीन दशकांनी ताकदवर सरकार आले आहे. तेच देशाला विकासाच्या मार्गावर नेऊ शकते, असेही मोदींनी यावेळी म्हटले. मोदींनी आपल्या भाषणात नाव न घेता काँग्रेसला लक्ष्य केलं. तसेच, घराणेशाही म्हणत काँग्रेसवर निशाणा साधला. पुन्हा एकदा भाजपाचेच सरकार येईल, असा विश्वासही अप्रत्यक्षपणे त्यांनी लाल किल्ल्यावरुन व्यक्त केला. त्यानंतर, मल्लिकार्जुन खर्गें आणि मीरा कुमार यांनी मोदींच्या भाषणावर पलटवार केला
''जे निवडणुकांमधून विजयी होतात, तेच तर राजकारणात असतात. त्यामुळे, घराणेशाही किंवा वंशवादाचा मुद्दा येतोच कुठे? असा थेट सवाल मीरा कुमार यांनी विचारला. तसेच, सरकार कोणाचं येतंय, कोणाचं नाही हे भाषण करण्यासाठी लाल किल्ल्याचं ऐतिहासिक स्थळ नाही. देशासाठी काय केलं पाहिजे आणि देश पुढे नेण्यासाठी काय करणार आहोत, यासंदर्भात पंतप्रधानांचं भाषण असायला हवं, असे म्हणत लोकसभेच्या माजी सभापती आणि काँग्रेस नेत्या मीरा कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर जोरदार टीका केली.
ते स्वत:च्या घरी झेंडावंदन करतील
मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावरही टीका केली. पुढच्यावर्षी पुन्हा एकदा आपणच झेंडा फडकवू, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. त्यावर, पलटवार करताना खर्गेंनी मोदींना टोला लगावला. पुढच्यावर्षी १५ ऑगस्टला ते झेंडावंदन करतील, पण त्यांच्या घरी, असे म्हणत खर्गे यांनी मोदींवर जोरदार निशाणा साधला.
सुप्रिया सुळेंचाही पलटवार
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन भाषण करताना भ्रष्टाचार आणि घराणेशाहीवर भाष्य केलं. मात्र, घराणेशाही तर आज प्रत्येक पक्षात आहे. मला गृहमंत्री अमित शहांचं संसदेतील भाषण आठवतं. जेव्हा आपण समोरच्याकडे एक बोट दाखवतो, तेव्हा चार बोटे आपल्याकडे असतात, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर पलटवार केला आहे.