मुंबई :
अदानी प्रकरणात संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) चौकशीची गरज नसल्याचे सांगणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी वेगळी भूमिका घेत सहकारी पक्षांच्या जेपीसीच्या मागणीचे समर्थन केले.
अदानी समूहात २० हजार कोटी रुपये कोठून आले, असा सवाल उठवत या प्रकरणाची जेपीसीमार्फत चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने लावून धरली आहे. जेपीसीची आवश्यकता नसल्याचे सांगत पवार यांनी काँग्रेसच्या भूमिकेला छेद दिला होता. त्यावरून काँग्रेसने नाराजी व्यक्त केल्यानंतर विरोधी पक्षांच्या ऐक्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, जेपीसीबाबत राष्ट्रवादीची भूमिका वेगळी असली तरी विरोधकांचे ऐक्य अबाधित राहावे ही आमची भूमिका आहे. त्यामुळे जेपीसी चौकशीची मागणी राष्ट्रवादी नाकारत नाही, अशी भूमिका पवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना मांडली. उद्धव ठाकरेंनी त्यावेळी विश्वासात घेतले नाही उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना सहकारी पक्षांना विश्वासात घ्यायला हवे होते. मात्र, त्यावेळी तसे घडले नाही, अशी खंत देखील शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली. ज्या वेळी कोणतेही सरकार एकत्रपणे असते तेव्हा असा निर्णय घेताना सहकारी पक्षांसोबत विचारविनिमय करायला हवा असतो. फडतूस-काडतूसवर... राज्यात फडतूस शब्दावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार सामना पाहायला मिळाला. परंतु फडतूस आणि काडतूस शब्दावरून शरद पवार यांनी सर्वच नेत्यांचे कान टोचले. वैयक्तिक टीकाटिप्पणी करू नका, असे खडेबोल त्यांनी सुनावले. वैयक्तिक हल्ला नको, राजकीय विषय घ्या, लोकांचे विषय घ्या, त्यावर आक्रमक व्हा. वैयक्तिक हल्ला, चिखलफेक ही स्थिती येता कामा नये, असे ते म्हणाले.
अदानी समूहात एलआयसी, स्टेट बँक ऑफ इंडिया, पीएफचा पैसा बेकायदा गुंतवलेला आहे. हा जनतेच्या कष्टाचा पैसा आहे, त्याचा हिशेब जनतेला मिळालाच पाहिजे. अदानी कंपन्यांतील घोटाळ्याचे सत्य बाहेर आणायचे असेल तर जेपीसी चौकशीतूनच सर्व सत्य बाहेर येऊ शकते. म्हणूनच काँग्रेससह देशातील १९ पक्षांनी जेपीसीची मागणी केली आहे आणि काँग्रेस आजही या मागणीवर ठाम आहे.- नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेसराष्ट्रवादीची जेपीसी चौकशीबाबत भूमिका वेगळी असली तरी सहकारी पक्षांच्या मागणीचे समर्थन आहे. मात्र, जेपीसीमधून फारसे काही निष्पन्न होणार नाही, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे.
सध्या महाविकास आघाडी भक्कम, मात्र...सध्या महाविकास आघाडी भक्कम असून आघाडीतून ज्या नेत्याला बाहेर पडायचे असेल तो त्याचा व्यक्तिगत निर्णय असेल. तो पक्षाचा निर्णय नसेल. असेही पवार यांनी स्पष्ट केले.