बंगळुरू : काँग्रेसलापंतप्रधान पदाचा कोणताही मोह नसून, लोकशाही वाचविण्याचे आमचे लक्ष्य आहे. आमच्यात मतभेद असले तरीही ते सामान्य नागरिकांच्या सुरक्षेपेक्षा मोठे नसल्याचे मत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले. ते विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत बोलत होते.
खरगे म्हणाले की, ‘इंडिया’च्या घटक पक्षांची पुढील बैठक मुंबईत होणार असून, त्यात निमंत्रक आणि समन्वय समितीच्या सदस्यांची निवड हाईल. ‘इंडिया’ नावाच्या प्रस्तावाला सर्वांनी एकमुखाने पाठिंबा दिला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दिल्लीत सर्व घटक पक्षांचे सचिवालय स्थापन करण्यात येणार आहे. देश आणि नागरिकांचे रक्षण करणे याला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. यासाठी आम्ही मतभेद मागे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
कोण काय म्हणाले? ममता बॅनर्जी : ‘तुम्ही ‘इंडिया’ला आव्हान देऊ शकता का? आगामी लोकसभा निवडणुकीत भारतच जिंकेल. अरविंद केजरीवाल : देश वाचवण्यासाठी आणि नवीन भारत घडवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.उद्धव ठाकरे : काही लोकांना वाटते की, आम्ही कुटुंबासाठी लढतोय. होय, हा देश आमचा परिवार आहे आणि आम्ही देश वाचवण्यासाठी लढत आहोत.
इंडिया जिंकेल...‘भारतासमोर जेव्हा कोणी उभे राहते तेव्हा कोण जिंकते हे सांगायची गरज नाही. भारत एकजूट होणार, ‘इंडिया’ जिंकेल, असे राहुल गांधी म्हणाले.
बैठकीत काय ठरले?
राज्यघटनेत अंतर्भूत भारताच्या कल्पनेचे रक्षण करण्याचा निर्धार आम्ही व्यक्त करतो. आपण आपल्या देशाच्या इतिहासातील सर्वांत गंभीर टप्प्यावर आहोत. भारतीय राज्यघटनेचे मूलभूत स्तंभ - धर्मनिरपेक्ष लोकशाही, आर्थिक सार्वभौमत्व, सामाजिक न्याय आणि संघराज्य - पद्धतशीरपणे कमकुवत केले जात आहेत.आम्ही अल्पसंख्याकांविरुद्ध होत असलेल्या द्वेष आणि हिंसाचाराला पराभूत करण्यासाठी एकत्र आलो आहोत. महिला, दलित, आदिवासी आणि काश्मिरी पंडितांविरुद्धचे वाढते गुन्हे रोखण्यासाठी, सर्व सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या समुदायांसाठी न्याय्य सुनावणीची मागणी करत आहोत. पहिली पायरी म्हणून जात जनगणना लागू करा.
इंडिया गटात कोण?
काँग्रेस, द्रमुक, तृणमूल कॉंग्रेस, जदयू, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार), राष्ट्रीय जनता दल, सीपीआय (एम), समाजवादी पार्टी, इंडियन युनियन मुस्लीम लीग, सीपीआय, आम आदमी पार्टी, झारखंड मुक्ती मोर्चा, केरळ काँग्रेस (एम), नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, सीपीआय (एमएल), राष्ट्रीय लोकशाही दल, एमएमके, एमडीएमके, व्हीसीके, आरएसपी, केएमडीके, अपना दल, एआयएफबी, केरळ काँग्रेस
दिग्गज नेत्यांची उपस्थितीकाँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ममता बॅनर्जी, नितीश कुमार, एम. के. स्टॅलिन, लालू प्रसाद यादव, उद्धव ठाकरे, हेमंत सोरेन, अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव आणि इतर बडे नेते या बैठकीला या उपस्थित होते.