नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या २०२३ च्या नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्कमध्ये (एनआयआरएफ) राज्यातील एकही विद्यापीठ देशातील पहिल्या दहामध्ये स्थान मिळवू शकले नाही. बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने देशातील १०० विद्यापीठांमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. मुंबई येथील होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूटने १७ वा, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने १९ वा क्रमांक मिळवत पहिल्या २० मध्ये स्थान मिळवले.
दरवर्षी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाद्वारे देशातील प्रमुख विद्यापीठांसह १० वेगवेगळ्या प्रवर्गातील महाविद्यालयांची रँकिग जाहीर केली जाते. त्यानुसार अध्यापन, अध्ययन, संशोधन, आकलन, व्यावसायिक शिक्षण, अभ्यासक्रमांची परिणामकारकता, आदी निकषांनुसार महाविद्यालयांची क्रमवारी जाहीर केली जाते. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंह यांनी यंदाच्या वर्षाची ‘एनआयआरएफ’ रँकिंग जाहीर केली.
उच्च शिक्षण देणाऱ्या सर्वशाखीय संस्थांमध्ये पहिल्या तीनमध्ये अनुक्रमे आयआयटी मद्रास, आयआयएससी बंगळुरू आणि आयआयटी दिल्लीचा समावेश असून, आयआयटी मुंबईने चौथा क्रमांक प्राप्त केला. दुसरीकडे विद्यापीठांच्या प्रवर्गामध्ये बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स पहिल्या क्रमांकावर असून, दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर महाविद्यालयांमध्ये दिल्लीतील मिरांडा हाऊस आणि हिंदू कॉलेज अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर, तर चेन्नईचे प्रेसिडन्सी महाविद्यालय तिसऱ्या क्रमांकावर आहे.
पहिल्या शंभरमध्ये राज्यातील कोणती विद्यापीठे?
विद्यापीठ क्रमवारीहोमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट, मुंबई - १७ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ - १९ इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी, मुंबई - २३ सिम्बयोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, पुणे - ३२ दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन ॲण्ड रिसर्च, वर्धा - ३९ डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे - ४६ नर्सी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मुंबई - ४७ मुंबई विद्यापीठ - ५६ भारती विद्यापीठ, पुणे - ९१ टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, मुंबई -९८
प्रमुख अभियांत्रिकी महाविद्यालये
१. आयआयटी मद्रास२. आयआयटी दिल्ली३. आयआयटी मुंबई४. आयआयटी कानपूर५. आयआयटी रुरकी
प्रमुख व्यवस्थापन महाविद्यालये
१. आयआयएम अहमदाबाद२. आयआयएम बंगळुरू ३. आयआयएम कोझिकोडे ४. आयआयएम कोलकाता५. आयआयटी दिल्ली