अयोध्येतील राम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. २२ जानेवारी रोजी मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या सोहळ्याचे सर्वपक्षीयांना निमंत्रण देण्यात आले . दरम्यान, काल अभिषेक सोहळ्यात सहभागी होणार नसल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. यावरून पक्षात गोंधळ उडाला असून निषेधाचे सूर उमटू लागले आहेत. गुजरातमध्ये काँग्रेसचे कार्याध्यक्ष अंबरिश डेर, आमदार अर्जुन मोधवाडिया, यूपी काँग्रेसचे आचार्य प्रमोद कृष्णा यांसारख्या नेत्यांनी पक्षाच्या निर्णयाला जोरदार विरोध केला आहे. प्रभू राम हे देशातील जनतेच्या श्रद्धेचा विषय असल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.
सिंगापूरपेक्षा उत्तर प्रदेशातील अयोध्येचे तिकीट महाग; दुबई, बॅंकाॅकलाही दरांमध्ये टाकले मागे
काँग्रेस नेते अंबरीश डेर यांनी ट्विटरवर पोस्ट करून म्हटले आहे की, मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम हे आमचे पूजनीय दैवत आहेत, त्यामुळे भारतभरातील असंख्य लोकांची श्रद्धा या नव्याने बांधलेल्या मंदिरावर वर्षानुवर्षे जोडलेली आहे. काँग्रेसच्या काही लोकांनी अशा विधानापासून अंतर राखले पाहिजे आणि जनभावनेचा मनापासून आदर केला पाहिजे, असंही यात म्हटले आहे.
गुजरात काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि पोरबंदरचे आमदार अर्जुन मोधवाडिया यांनी ट्विटरवर लिहिले की, भगवान श्री राम हे आराध्य देव आहेत. हा देशवासीयांच्या श्रद्धेचा विषय आहे. काँग्रेसने असे राजकीय निर्णय घेण्यापासून दूर राहायला हवे होते.
उत्तर प्रदेशातील काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनीही प्रश्न उपस्थित केला आणि म्हणाले, राम मंदिर आणि प्रभू राम सर्वांचे आहेत. राम मंदिराला भाजप, आरएसएस, विहिंप किंवा बजरंग दल मानणे दुर्दैवी आहे. मला विश्वास आहे की काँग्रेस हा हिंदू विरोधी पक्ष नाही. तोही रामाच्या विरोधात नाही. असा निर्णय घेण्यामागे काही लोकांची भूमिका आहे. हा अतिशय गंभीर विषय आहे. या निर्णयामुळे कोट्यवधी काँग्रेस कार्यकर्त्यांचे मन भंगले आहे, असंही त्यांनी म्हटले आहे.
"ज्यांची प्रभू रामावर श्रद्धा आहे. काँग्रेस हा महात्मा गांधींच्या मार्गावर चालणारा पक्ष आहे. काँग्रेस असा पक्ष आहे ज्याचे नेते राजीव गांधी यांनी या राम मंदिराची पायाभरणी केली आणि राम मंदिराची कुलूप उघडली. प्रभू श्री राम मंदिराचे निमंत्रण न स्वीकारणे हे अत्यंत दु:खद, वेदनादायी आहे,असंही आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचा मुलगा आणि छिंदवाडा येथील खासदार नकुलनाथ यांनीही एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात लिहिले आहे की, छिंदवाडा रामाची ४ कोटी ३१ लाख नावे लिहून इतिहास रचणार आहे. त्याच क्रमाने आज माजी मुख्यमंत्री आदरणीय कमलनाथजी यांच्यासह सिमरिया हनुमान मंदिरात पोहोचले आणि पत्रकात रामाचे नाव लिहिले. आपण सर्वांनी या ऐतिहासिक कार्यात सहभागी होऊन पुण्य मिळवावे असे मी आवाहन करतो.
'पक्षाच्या निर्णयाच्या समर्थनार्थ दिग्विजय सिंह
काँग्रेसमध्ये असे काही नेते आहेत जे पक्षाच्या बचावासाठी मैदानात उतरले आहेत. राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह म्हणाले की, आमच्यासारख्या लोकांच्या दानावर राम मंदिर उभारले जात आहे. आपण सर्वांनी देणगी दिली आहे. शंकराचार्यांचा अपमान होत आहे, याला आमचा आक्षेप आहे. राम मंदिरावर विहिंपचा काय अधिकार? आम्ही राम मंदिरासाठी देणगी दिली आहे. नरसिंह राव यांनी चार शंकराचार्यांसह ‘रामालय ट्रस्ट’ स्थापन केला होता. हे आजही सुरू आहे. त्यांना बांधकामाचे अधिकार का दिले नाहीत? चंपत राय हे VHP प्रचारक असून त्यांनी जमीन घोटाळा केला आहे. अशा व्यक्तीला मंदिर प्रमुख बनवण्यात आले आहे, जो धर्माचा अपमान करत आहे आणि हिंदू नेते आणि धर्मात फूट पाडत आहे, असा आरोपही त्यांनी केला.