चेन्नई : हवाई दलाच्या बेपत्ता एन-३२ विमानांचा शनिवारी, दुसऱ्या दिवशीही शोध सुरूच असून, त्याचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नव्हता. या विमानाबाबत आता चिंता वाढत चालली आहे. भारतीय हवाई दल, नौदल आणि तटरक्षक दल या मोहिमेत सहभागी असून, एक पाणबुडी, आठ विमाने आणि १३ नौका या विमानाचा शोध घेत आहेत. तथापि, विमानाचा कोणताही सुगावा लागू शकलेला नाही. शोधमोहिमेत खराब हवामानाचा अडथळा येत आहे. समुद्र खवळलेला आहे. आकाशात ढगांचे दाट आच्छादन आहे. लष्करी साहित्याची वाहतूक करणारे हे विमान शुक्रवारी हवाई दलाच्या चेन्नई येथील तांबरम तळावरून उडाले होते. ते पोर्टब्लेअरला उतरणार होते. तथापि, उड्डाणानंतर अवघ्या १६ मिनिटांतच ते रडारवरून गायब झाले. विमानाशी शेवटचा संपर्क झाला, तेव्हा सकाळचे ८.४६ वाजले होते. त्यानंतर, त्याचा कोणताच ठाकठिकाणा लागलेला नाही. तेव्हापासून त्याचा शोध घेतला जात आहे. विमानात २९ व्यक्ती आहेत. त्यात ४ लष्करी अधिकारी असून, ६ चालक दल सदस्य आहेत. त्यात २ पायलटांचा समावेश आहे. विमानात हवाई दलाचे एकूण ११ जण, लष्कराचे २, तटरक्षक दलाचा १ आणि नौदलाचे ९ जण आहेत. पर्रीकर चेन्नईत...संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी चेन्नईला धाव घेतली आहे. ते चेन्नईत तळ ठोकून असून, ते शोधमोहिमेवर लक्ष ठेवून आहेत. आयएएफ एन-३२ विमानाशी संबंधित शोधमोहिमेचा आढावा घेण्यासाठी आपण इथे आलो असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विमानातील व्यक्तींच्या कुटुंबीयांच्या संपर्कात राहून आवश्यक ती सर्व माहिती त्यांना तातडीने देण्याच्या सूचका पर्रिकर यांनी सर्व वरिष्ठ कमांडरांना दिल्या आहेत. पर्रिकर यांना घेऊन पी-८१ हे विमान बंगालच्या उपसागरावर उडाले. या विमानातून सुमारे दोन तासांपर्यंत त्यांनी शोध मोहिमेची पाहणी केली.
हवाई दलाच्या विमानाचा शोध अद्यापही नाहीच
By admin | Published: July 24, 2016 5:16 AM