मलकानगिरी (ओडिशा) : मलकानगिरी जिल्ह्यातील ग्रामस्थांनी सर्व सरकारी कल्याणकारी कार्यक्रम आमच्या वसाहतींत अमलात आणले, तर आम्ही गांजाची लागवड करणे थांबवू, असे म्हणत रस्त्यांवर निदर्शने केली. गांजाची लागवड करणाऱ्यांना नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रोपिक सबस्टॅन्सेस ॲक्ट, १९८५ मध्ये कठोर दंडाची तरतूद असल्याची माहिती असतानाही ग्रामस्थांनी प्रशासनापुढे ही अट ठेवली. रालेगाडा ग्रामपंचायतींच्या ३५ खेड्यांतील सुमारे १० हजार रहिवासी गांजाची लागवड थांबवण्याची अट सांगण्यासाठी सोमवारी धुलिपूट येथे एकत्र जमले होते. त्यांनी आपल्या १९ मागण्याही यावेळी मांडल्या. “आम्हाला आमच्या कृषी उत्पादनाला प्रत्यक्ष हवा तसा भाव मिळत नाही. रालेगाडा आणि त्या परिसरातील ग्रामपंचायतीचे बहुसंख्य ग्रामस्थ हे गांजाच्या लागवडीवर अवलंबून आहेत. गांजाच्या लागवडीतून मिळणाऱ्या पैशांमुळे आम्ही आमची मुले दूर अंतरावरील ठिकाणी शिक्षणासाठी पाठवू शकतो,” असे रालेगाडाचे रहिवासी कामुलू हंताल म्हणाले.
जमिनीचे वाद सोडवावेतराष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा आणि पंतप्रधान आवास योजनेखाली सगळ्या घरांना सामावून घ्यावे, वन हक्क कायद्याखाली जमिनीचे वाद सोडवावेत आणि सर्व कृषी उत्पादनांना किमान आधारभूत किमत द्यावी, अशा या आंदोलक ग्रामस्थांच्या मागण्या आहेत.