हैदराबाद - एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या या विधानावरुन मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. हैदराबाद येथे शुक्रवारी रात्री एका जाहीर सभेमध्ये बोलताना त्यांनी हे चिथावणीखोर वक्तव्य केले. जेव्हा आम्ही हिरवा रंग परिधान करु तेव्हा सर्व हिरवे करु. त्यावेळी आमच्या हिरव्या रंगासमोर कुठलाही रंग टिकणार नाही. आमच्या रंगासमोर ना मोदींचा, ना काँग्रेसचा रंग टिकणार फक्त हिरवा रंग पहाल असे असुद्दीन ओवेसी म्हणाले.
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी मुस्लिम मतांमध्ये रुची दाखवला नाही. ते अशा पद्धतीने निवडणुका जिंकू शकतात पण अशाने आपली लोकशाही कमकुवत होईल. जाणीवपूर्वक मुस्लिमांचा राजकीय प्रभाव कमी करणे हे चांगले नाही असे ओवेसी म्हणाले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या मंदिर भेटीवरही त्यांनी टीका केली.
राहुल गांधींनी गुजरातमध्ये मंदिरांना भेटी दिल्या ते मशिद किंवा दर्ग्यात का गेले नाहीत ?, कुठल्या मुस्लिम नेत्यासोबत त्यांचा फोटोही समोर आला नाही असा आरोप ओवेसी यांनी केला. गुजरात निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधी यांनी एकूण 27 मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतले. त्यांचा राजकीय लाभही काँग्रेसला मिळाला. राहुल गांधींनी ज्या मंदिरांना भेटी दिल्या तिथल्या 27 पैकी 18 विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार विजयी झाले.
काँग्रेसने या निवडणुकीत सॉफ्ट हिंदुत्वाचे धोरण स्वीकारल्याचीही टीका झाली. भाजपानेही राहुल गांधींच्या मंदिर भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तोच धागा पकडून ओवेसींनी राहुल यांच्यावर जोरदार टीका केली. आजही गुजरातमध्ये आल्यानंतर राहुल गांधींनी सोमनाथ मंदिरात जाऊन दर्शन केले. 2012 मध्ये गुजरातमध्ये काँग्रेसने 61 जागा जिंकल्या होत्या. यावेळी काँग्रेसच्या जागा वाढून 77 झाल्या.