नवी दिल्ली, दि. 17 - जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारला उद्देशून असे विधान केले आहे की ज्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. चीन किंवा पाकिस्तानपेक्षा भारतातच असे काहीजण आहेत ज्यांपासून देशाला धोका आहे, असे विधान फारूख अब्दुल्ला यांनी एका कार्यक्रमात केले आहे. 'भारताला देशाबाहेरुन धोका नाही. चीन आणि पाकिस्तान भारताचे काहीही वाकडं करू शकत नाही. तर देशातच मोठा चोर बसला आहे, तोच सर्व काही बिघडवत आहे', असे वादग्रस्त विधान फारूख अब्दुल्ला यांनी केले आहे. या वक्तव्याद्वारे अब्दुल्ला यांनी अप्रत्यक्षरित्या केंद्र सरकारला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे. यावर राजकारणातील विरोधकांचं असे म्हणणे आहे की, अब्दुल्ला यांनी असे विधान करत पाकिस्तान आणि चीनसारख्या देशांना एकप्रकारे क्लीन चिटच दिली आहे, जे भारतविरोधी कारवाया करत आले आहेत. नवी दिल्लीत विरोधी पक्षांच्या आयोजित कार्यक्रमात फारूक अब्दुल्ला बोलत होते. या कार्यक्रमात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि जेडीयूचे शरद यादवदेखील उपस्थित होते.
अब्दुल्ला पुढे असेही म्हणाले की, ''यात कोणतीही शंका नाही की मी मुसलमान आहे आणि मी गर्वाने सांगतो की मी एक भारतीय मुसलमान आहे. आज भारताला बाहेरुन धोका नाही. चीन आपलं काहीही वाकडं करू शकत नाही. पाकिस्तानही आपले काहीही वाईट करू शकत नाही. देशातच चोर बसला आहे, जो सर्व काही बिघडवत आहे''
वाचा आणखी बातम्या (पंतप्रधानांच्या भाषणावर टीका करावी इतके राहुल गांधी सक्षम नाहीत - भाजपा)('इंदिरा'ऐवजी चुकून 'अम्मा' बोलून फसले राहुल गांधी )(केरळमध्ये सरसंघचालकांना ध्वजरोहणापासून रोखणा-या जिल्हाधिका-याची बदली)
मोदी सरकारनेच पाकिस्तानला दिली कुरापती करण्याची संधी - राहुल गांधीदरम्यान, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या जम्मू काश्मीर धोरणावर हल्ला करत सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळेच पाकिस्तानला कुरापती करण्याची संधी मिळाल्याची टीका केली. राहुल गांधी यांनी सांगितले की, 'मोदी सरकारमुळे पाकिस्तानला आधीच समस्यांना तोंड देत असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये चुकीच्या गोष्टी करण्याची संधी मिळाली'. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाला केलेल्या भाषणामध्ये केलेल्या काश्मीरच्या उल्लेखावर बोलताना राहुल गांधी यांनी ही टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करुन सलग चौथ्यांदा देशवासियांनी संबोधित केले. 'गाली से ना गोली से', 'परिवर्तन होगा हर कश्मिरी को गले लगाने से', असं नरेंद्र मोदी बोलले होते. राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत म्हटले की, 'त्यांनी जम्मू काश्मीरध्ये हिंसा आणि द्वेष पसरवला आहे. यामुळे पाकिस्तानचा फायदा झाला आहे'. राहुल गांधी यांनी यावेळी दावा केला आहे की, त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासोबत मिळून कोणताही तमाशा किंवा ड्रामा न करता काश्मीरच्या मुद्द्यावर काम केलं होते. 'पी चिदंबरम आणि जयराम रमेशसारख्या नेत्यांनी काश्मीरसाठी 10 वर्ष काम केलं, पण मोदी सरकारने त्यांचे हे सर्व प्रयत्न वाया घालवले आहेत', अशीही टीका राहुल गांधींनी केली आहे.