मोदींवरील अविश्वास आता संसदेबाहेरही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 02:36 AM2018-07-22T02:36:25+5:302018-07-22T02:37:04+5:30
देशभर भाजपा व केंद्र सरकारविरुद्ध वातावरण निर्माण करण्याचे विरोधी पक्षांनी ठरविले आहे
नवी दिल्ली : लोकसभेत विरोधकांनी मोदी सरकारविरुद्ध मांडलेला अविश्वासाचा ठराव फेटाळला गेला असला तरी आता संसदेबाहेर म्हणजेच देशभर भाजपा व केंद्र सरकारविरुद्ध वातावरण निर्माण करण्याचे विरोधी पक्षांनी ठरविले आहे.
त्याचाच भाग म्हणून तृणमूल काँग्रेसच्या नेत्या व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकात्यातील प्रचंड जाहीर सभेत ‘भाजपा हटाव, देश बचाव’चा नारा दिला, तर तेलगू देसमचे नेते व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दिल्लीतच पंतप्रधान मोदी यांना आव्हान दिले.
देशभरात सभा, मेळावे, मोर्चे व पत्रकार परिषदा घेऊ न मोदी यांना व त्यांच्या सरकारला सर्व बाजूंनी घेरण्याची रणनीती विरोधकांनी आखायला सुरुवात केली आहे. पुढील महिन्यात विरोधी पक्षांचे नेते पश्चिम बंगालमध्ये एकत्र येणार आहेत. चंद्राबाबू नायडू यांनी मोदी यांनी लोकसभेत दिलेली माहिती चुकीची असल्याचे सांगून, आपली तुलना अनेक आरोप असलेल्या वायएसआर काँग्रेसच्या जगन रेड्डींशी करू नका, असा इशारा मोदींना दिला.
भाजपा नेते काँग्रेसच्या संपर्कात?
भाजपाच्या १५0 खासदारांना पुन्हा लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याच्या वृत्ताने त्या पक्षातही अस्वस्थता आहे. त्यामुळे भाजपाचे किमान ६0 खासदार काँग्रेस नेत्यांशी संपर्क साधून असल्याचे वृत्त आहे. खासदार शत्रुघ्न सिन्हा व कीर्ती आझाद त्यांचे नेतृत्व करीत असल्याची चर्चा आहे. या वर्षी विधानसभा निवडणुका होणाऱ्या राजस्थानातील भाजपाचे २२ आमदार काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा दावा काँग्रेसचे नेते अविनाश पांडे यांनी केला. - सविस्तर वृत्त/२