नवी दिल्ली - माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भारताप्रतीची निष्ठा आणि बांधिलकीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे नव्हते. तसा मूळात हेतूच नव्हता. आमच्या मनात मनमोहन सिंह आणि माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्याबद्दल प्रचंड आदराची भावना आहे असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी राज्यसभेत सांगितले.
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मनमोहन सिंग व अन्य काँग्रेस नेत्यांनी एका भोजन समारंभात गुजरातच्या प्रश्नाबाबत पाकिस्तानच्या अधिका-यांशी चर्चा केल्याचा आरोप केला होता. खरतर तशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे तेथे उपस्थित असलेले माजी लष्कर अधिकारी, माजी राजनैतिक अधिकारी व पत्रकार यांनी स्पष्ट केले होते.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाल्यापासून काँग्रेसने हा मुद्दा लावून धरताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या आरोपांवर स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी केली. त्यावर अखेर आज भाजपाकडून अरुण जेटली यांनी स्पष्टीकरण दिले. भाजपाने थेट माफी मागितली नाही पण मोदींचा मनमोहन सिंग यांच्या निष्ठेवर प्रश्न उपस्थित करण्याचा हेतू नव्हता असे सांगितले. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणातून मनमोहन सिंग किंवा हमीद अन्सारी यांच्या बांधिलकीबद्दल शंका उपस्थित केली नाही. असा कोणाचा दृष्टीकोन असेल तर तो चुकीचा आहे असे जेटली यांनी राज्यसभेत सांगितले.