- खलील गिरकर मुंबई : ट्रायच्या नवीन नियमावलीप्रमाणे ग्राहकांच्या आवडीच्या वाहिन्यांसाठी त्यांच्याकडून अर्ज भरून घेतले जात असून, उर्वरित ग्राहकदेखील लवकर अर्ज भरून देतील. ग्राहकांच्या सोयीसाठी वेबसाइट व इतर सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. आतापर्यंत देशातील ४० टक्क्यांपेक्षा जास्त ग्राहकांनी आवडीच्या वाहिन्या पाहण्याचा अर्ज भरून दिला आहे. त्यामुळे कितीही मागणी झाली, तरी कोणत्याही परिस्थितीत या नियमावलीच्या अंमलबजावणीला मुदतवाढ मिळणार नसल्याचे ट्रायतर्फे स्पष्ट करण्यात आले. ट्रायचे सल्लागार अरविंद कुमार यांनी ही माहिती दिली.कुमार म्हणाले की, ग्राहकांना ३१ जानेवारीपूर्वी आपल्या आवडीच्या वाहिन्यांची यादी अर्ज भरून, केबल चालक व एमएसओकडे देण्याची गरज आहे, तरच त्यांच्या पे चॅनेलचे प्रसारण विनाव्यत्यय सुरू राहील. मात्र, ३१ जानेवारीपर्यंत जे ग्राहक अर्ज भरून देणार नाहीत, त्यांचे केबल प्रसारण बंद होणार नाही. त्यांच्या टीव्हीवर ब्लॅकआउट होणार नाही. १०० निशुल्क वाहिन्या त्यांना १३० रुपयांमध्ये पाहता येतील व त्यांच्याकडून तेवढीच रक्कम आकारली जाईल. मात्र, त्यांना पे चॅनेल पाहता येणार नाहीत. त्यामुळे आपल्या आवडीच्या वाहिन्या पाहण्यामध्ये कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी ग्राहकांनी वेळीच अर्ज भरून द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. ट्रायच्या नियमावलीला मुदतवाढ मिळणार असल्याची अफवा पसरविण्यात येत असून, ग्राहकांनी त्यावर विश्वास ठेवू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
ट्रायच्या नियमावलीला मुदतवाढ नाहीच
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 6:13 AM