नवी दिल्ली : प्रसिद्धी माध्यमांच्या कामकाजात सरकारी हस्तक्षेप असू नये, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे म्हटले. मात्र, त्याचबरोबर बाह्य हस्तक्षेपाने गोष्टी बदलणार नसल्याचे सांगून, काळानुरूप स्वत:त बदल घडवून स्वयंनियमनाचा सल्लाही त्यांनी माध्यमांना दिला. पत्रकारांच्या अलीकडील हत्यांबद्दल तीव्र चिंता व्यक्त करताना ते म्हणाले की, ‘हे अत्यंत दु:खदायक असून, सत्य दडपून टाकण्याची सर्वात धोकादायक पद्धत आहे.’ बिहारमध्ये दोन पत्रकारांची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही टिप्पणी केली. प्रेस कौन्सिल आॅफ इंडियाच्या (पीसीआय) सुवर्णजयंती सोहळ्यात ते बोलत होते. माध्यमांनी स्वयंनियमन अंगी बाणावे, या आपल्या सल्ल्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी महात्मा गांधींचे विचार उद्धृत केले. ‘अनियंत्रित लेखनाने अनेक समस्या निर्माण होतील, असे महात्मा गांधींनी म्हटले होते. तथापि, त्यांनी हेदेखील म्हटले की, बाह्य हस्तक्षेप अनर्थ घडवून आणेल. माध्यमांना बाहेरून नियंत्रित करण्याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही,’ असे ते म्हणाले. ‘सरकारने कोणताही हस्तक्षेप करायला नको. हे खरे आहे की, स्वयंनियमन सोपे नाही. आपण काळानुरूप कोणते उपयुक्त बदल करू शकतो, हे पाहणे ही पीसीआय आणि माध्यम व्यवसायाशी संबंधित इतर संस्थांची जबाबदारी आहे. बाह्य हस्तक्षेपाने गोष्टी बदलत नाहीत, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी एखाद्या विशिष्ट बदलाचा उल्लेख केला नाही. तथापि, ते म्हणाले की, ‘जुन्या काळात पत्रकारांकडे सुधारणा करण्यासाठी पुरेसा वेळ असायचा. मात्र, वेगवान इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाच्या युगात आता ही संधी नाही.’ (लोकमत न्यूज नेटवर्क)
प्रसिद्धी माध्यमांच्या कामात सरकारी हस्तक्षेप नको
By admin | Published: November 17, 2016 2:30 AM