नवी दिल्ली : देशात प्रचंड दबदबा असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीजना (आयआयटी) जागतिक पातळीवर मात्र स्थान पटकावता आलेले नाही. क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटीने २०१६-२०१७ या वर्षासाठी मंगळवारी जाहीर केलेल्या जागतिक क्रमवारीने (वर्ल्ड रँकिंग) ही बाब स्पष्ट केली. या यादीत सलग पाचव्या वर्षी अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीने आपले पहिले स्थान टिकवून ठेवले आहे. भारतात बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्सचे स्थान सर्वोच्च असले तरी जागतिक पातळीवरील यादीत तिला पहिल्या १५० संस्थांमध्येही प्रवेश मिळवता आलेला नाही. मात्र आयआयटीने (मद्रास) पाच जागा वर चढून पहिल्या २५० संस्थांमध्ये स्थान मिळवले आहे एवढेच समाधान. आयआयएस संस्थांची घसरण यावर्षी भारतीय संस्थांच्या घसरणीशी जवळपास मिळतीजुळती आहे, असे हा अहवाल म्हणतो. दहा भारतीय विद्यापीठांपैकी नऊ विद्यापीठांचा दर्जा २०१५ मध्ये ७०० किंवा त्यापेक्षा जास्त होता तो दर्जाही घसरला ही वस्तुस्थिती आहे. हा दर्जा विद्यादान व रोजगार देण्याच्या प्रतिष्ठेलाही खाली आणणारा आहे. संशोधन क्षेत्रात जगात जी १०० विद्यापीठे आहेत त्यात भारताच्या केवळ चार संस्थांना स्थान मिळाले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
जागतिक यादीत ‘आयआयटी’ कुठेच नाही
By admin | Published: September 07, 2016 4:26 AM