ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३० - अभिनेता आमीर खानच्या पीके या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून हिरवा कंदील मिळाल्याने त्यावर आम्ही कारवाई करणार नाही असे स्पष्टीकरण माहिती व प्रसारण मंत्रालयाचे राज्यमंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी दिले आहे. मात्र कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्यास राज्य सरकार कारवाई करु शकतात असेही त्यांनी म्हटले आहे.
पीके चित्रपटाविरोधात सध्या देशभरात हिंसक आंदोलन असून या चित्रपटाद्वारे हिंदूच्या भावना दुखावल्याचा आरोप हिंदूत्ववादी संघटनांनी केला आहे. या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी बाबा रामदेव यांच्यासह अनेक हिंदूत्व संघटनांनी केली आहे. या विषयी माहिती व प्रसारण विभागाचे राज्यमंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांना मंगळवारी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सेन्सॉर बोर्डाकडून चित्रपटाला मंजूरी घ्यावी लागते. सेन्सॉर बोर्डच चित्रपटातील आक्षेपार्ह दृष्य वगळू करु शकतो. सेन्सॉर बोर्डाने हिरवा कंदील दाखवल्यावर केंद्र सरकार चित्रपटावर आक्षेप घेऊ शकत नाही. सुप्रीम कोर्टानेही यापूर्वीच्या निकालांमध्ये हे स्पष्ट केले आहे अशी आठवण त्यांनी करुन दिली. ज्या मंडळींना चित्रपटातील दृष्यांवर आक्षेप असेल त्यांनी न्यायालयामध्ये जावे असेही त्यांनी स्पष्ट केले.