ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - बॉलिवुडचा सुपरस्टार शाहरुख खानने 'दिलवाले' सिनेमाच्या प्रदर्शनाच्या दोन दिवस आधी असहिष्णूतेच्या आपल्या वक्तव्यावरुन घुमजाव केले आहे. देशात सर्व काही सुरळीत चालू असून, कुठेही असहिष्णूता नसल्याचे शाहरुखने म्हटले आहे.
असहिसष्णूतेबद्दल मी विधान केले नव्हते असा दावाही शाहरुखने केला. कुठल्या धर्मावरुन निष्कर्ष काढू नका असे मी माझ्या मुलांना बोललो होतो. ही सामान्य गोष्ट आहे. पण माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला असा दावा शाहरुखने केला. माझा दिलवाले सिनेमा प्रदर्शित होणार आहे म्हणून मी आज हे बोलतोय असा कोणी अर्थ काढू नये असेही शाहरुख म्हणाला. एका खासगी हिंदी वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात बोलताना शाहरुखने हे स्पष्टीकरण दिले.
शाहरुखने असहिष्णूतेसंदर्भात केलेल्या विधानावर भाजपचे नेते कैलशा विजयवर्गीय, योगी आदित्यनाथ चांगलेच संतापले होते. त्याला काहींनी देश सोडून जाण्याचाही सल्ला दिला होता. त्यावेळी शाहरुखला शिवसेना, काँग्रेसने पाठिंबा दर्शवला होता. भाजपनेही विजयवर्गीय आणि योगी आदित्यनाथ यांच्या मताशी पक्ष सहमत नसल्याचे स्पष्ट केले होते.